गणेशोत्सव जवळ आल्याचे सर्वप्रथम समजते ते मूर्ती कारखान्यांचे मंडप उभे राहिल्यावर. गणपतीचा लडिवाळ ‘फॉर्म’ अक्षरश: रूपात साकारतो. यंदा गणपती चक्क खंडोबाच्या रूपात अवतरणार आहे. अनेक मूर्तिकार खंडोबाच्या रूपातील गणपतीच्या मूर्ती घडवत आहेत.
बदलत्या काळानुसार गणपतीची रूपे, बैठक आणि रंगातही बदल होतात. शंकरापासून साईबाबांपर्यंत, शिवाजी महाराजांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत आणि अमिताभपासून सचिन तेंडुलकपर्यंत अनेक रूपांमध्ये गणपती बघायला मिळतो. यंदा त्या रूपांमध्ये ‘खंडेराया’ची भर पडणार आहे. यंदा बाजारात जेजुरीच्या खंडोबाच्या रूपातील गणपतीच्या मूर्ती उपलब्ध होणार आहेत. अर्थातच खंडोबाचे हे रूप ‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’मधील खंडेरायाचे आहे.

शंकराच्या रूपातील गणपतीच्या मूर्ती अनेक वर्षांपासून बघायला मिळतात. ध्यानमग्न शंकरापासून ते तांडव करणाऱ्या शंकरापर्यंत विविध रूपांचा त्यात समावेश असतो. खंडोबा हेही शंकराचेच एक रूप आणि महाराष्ट्रातील जनतेचे आद्यदैवत. त्यामुळे खंडेरायाच्या रूपातील गणपती हे विशेष नवलाचे नाही. परंतु एखाद्या लोकप्रिय मालिकेतील पात्राचे रूप घेऊन मूर्ती बनविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’ सध्या भलतीच लोकप्रिय आहे. त्यातील पीळदार शरीरयष्टीचा खंडेरायासुद्धा ‘हिट’ आहे. त्याच्या या लोकप्रियतेमुळेच एका मंडळाने त्याच्याच रूपातील गणपतीची मूर्ती बनवून घेतली आहे. पुण्यात तर अनेक ठिकाणी घरगुती गणपतीसुद्धा याच रूपात बनवण्यात येत आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये खंडेराय सिंहासनावर थाटात बसलेले दिसतात, त्या रूपातील मूर्तीनाही मोठी मागणी आहे. खंडेरायाच्या रूपातील या गणपतीच्या हातात तलवार आणि डमरू असून कपाळाला हळद लावलेली आहे. तसेच मालिकेप्रमाणे याच्याही सिंहासनावर सर्प आणि त्रिशूळ पाहायला मिळतात.
सध्याचा जमाना भव्य पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांचा आहे. एरवी फारशी माहीत नसलेली अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे या मालिकांच्या स्पर्शामुळे एकदम लोकप्रिय होतात. याच लोकप्रियतेच्या लाटांवर आरूढ होत गणपतीही त्यांच्या रूपात बनविण्याची लाटच यानिमित्ताने येते की काय, हे आता बघायचे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा