माणसाच्या कामाचे स्वरूप, त्याच्या कामाची जागा आणि त्यासाठी त्याला दिला जाणारा गणवेश या सगळ्यातून त्याची स्वत:च्या कर्तव्यनिष्ठेची अशी एक व्याख्या तयार झालेली असते. अगदी शाळेच्या वयापासून ‘युनिफॉर्म’ या नावाने अंगावर येणारी कर्तव्याच्या चौकटींची नियमावली आयुष्यभर वेगवेगळ्या रंगरूपात आपण अनुभवतो. कर्तव्यातून मिळणारे समाधान किंवा येणारा ताण या सगळ्याचं नातं कुठेतरी त्या गणवेशाशी जोडलं जातं. अतुल जगदाळे दिग्दर्शित ‘गणवेश’ या चित्रपटात ही भावना मधुकर या लहानग्याबरोबरच पोलीस अधिकारी मीरा आणि मंत्री देशमुख या तीन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पध्दतीने अधोरेखित होते. मात्र गणवेशामागच्या या भावनेपेक्षा नव्या गणवेशासाठीची पायपीटच चित्रपटात मुख्यत्वाने दिसत असल्याने त्यामागे दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ती गोष्ट अस्पष्टपणेच उतरली आहे.
‘गणवेश’ चित्रपटाची सुरूवातच मधुकरपासून होते. शाळेत स्वातंत्र्यदिनी मंत्र्यांबरोबर भाषण करायची मोठी संधी केवळ हुशारीच्या बळावर छोटय़ा मधुकरला मिळाली आहे. मात्र त्यासाठी नविन गणवेशच हवा, अशी शिक्षकांची अट आहे. रोजंदारीवरचे पोट असलेल्या मधुकरच्या आईवडिलांसाठी त्याला नविन गणवेश घेऊन देणं हे एक महागडं स्वप्न होऊन बसतं. आपल्या हुशार मुलाची निदान ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी हे जोडपं परिचितांकडे पैसे मागण्यापासून ते शहरात येऊन एक दिवस मोठी मजदूरी करण्यापर्यंत अनेक मार्ग चोखाळतात. ते नविन गणवेश घेतातही पण दरवेळी असं काही घडतं की तो गणवेश छोटय़ा मधुपर्यंत पोहोचतच नाही. त्याचवेळी गावात असलेल्या पोलीस अधिकारी मीरावरही मोठी जबाबदारी आहे. गावात दरोडे पडता आहेत. आणि दरोडेखोर हाताशी लागत नाहीत म्हणून मीरावर वरून दबाव येतो आहे. स्वयंघोषित स्थानिक नेत्याकडून एक स्त्री अधिकारी म्हणून होणारी मानहानी आणि कारण नसताना त्याच्या दबावाला बळी पडणाऱ्या पोलिस आयुक्तांचे निर्णय स्वीकारायला लागणाऱ्या मीराला खाकी वर्दीच्या ताकदीतला फोलपणा जाणवू लागतो. स्वातंत्र्यदिनासाठी म्हणून गावात आलेल्या मंत्री देशमुखांसाठीही पांढरीशुभ्र खादी हा जणू त्यांचा गणवेश बनला आहे. खादीशी इमान राखणाऱ्या देशमुखांनाही हायकमांडचा आदेश ऐकून मंत्रीपदावरून पायउतार होण्याचा निर्णय स्वीकारावा लागतो. या तीन समांतर कथा एकमेकांशी जोडत एक वेगळा पट मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र मधुकरच्या आईवडिलांची गणवेश घेण्यासाठीच्या धडपडीनेच चित्रपट व्यापला असल्याने मीरा आणि देशमुखांच्या कथेचा स्पष्ट अर्थ हाती लागत नाही.
गणवेश मिळवण्यासाठीची मधुकरच्या वडिलांच्या धडपडीची अखेर मंत्र्यांच्या गेस्ट हाऊसवर दान करण्यासाठी आलेल्या गणवेशाच्या चोरीतूनच होते. यामाध्यमातून ग्रामीण भागातील प्रचलित जीवनमान, तिथल्या राजकीय-सामाजिक जीवनाचा सर्वसामान्यांवर पडणारा प्रभाव या सगळ्यावर दिग्दर्शकाने अचूक बोट ठेवले आहे. पण आर्थिक परिस्थिती नाही आणि त्यातूनही मुलाला एक साधा गणवेश घेता येत नाही म्हणून होणारी त्याच्या आईवडिलांची कुतरओढ, त्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न हा कथाभाग याआधीही वेगवेगळ्या चित्रपटांमधून वेगळ्या पध्दतींनी आपण अनुभवलेला असल्याने त्यातला तोचतोचपणा खटकत राहतो. किशोर कदम, स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर असे एकापेक्षा एक कसलेले कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट उजवा ठरतो. चित्रपटातील काही प्रसंग अगदी छान जमले आहेत. स्वातंत्र्य दिनी मधुने केलेल्या भाषणात ब्रिटिशांना घालवण्यासाठी पत्री सरकारने दिलेला लढा आणि गणवेशासाठी आपल्या वडिलांना करावा लागलेला झगडा याची केलेली तुलना खरोखरच वर्मी घाव घालणारी आहे. त्या भाषणातून निघणारा छोटय़ा मध्याचा निष्कर्ष हा खरेतर या चित्रपटाचा गाभा असता तर एक वेगळा विचार चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असता. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात अतुल जगदाळे यांनी एक वेगळा वैचारिक चित्रपट द्यायचे धाडस केले आहे हेही नसे थोडके.
गणवेश
निर्माता – विजयते एंटरटेन्मेट
दिग्दर्शक – अतुल जगदाळे
कलाकार – किशोर कदम, स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, गुरू ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, शरद पोंक्षे, बालकलाकार तन्मय मांडे.
चित्ररंग : अस्पष्ट जाणिवांचा ‘गणवेश’
कर्तव्यातून मिळणारे समाधान किंवा येणारा ताण या सगळ्याचं नातं कुठेतरी त्या गणवेशाशी जोडलं जातं.
Written by रेश्मा राईकवार
Updated:
आणखी वाचा
First published on: 26-06-2016 at 01:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganvesh marathi movie review