बलशाली भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर गावपातळीवर काम करणे आवश्यक आहे. तसेच व्यक्तिगत पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या प्रयत्नांमधूनच देश बदलू शकतो आणि विश्वशांती प्रस्थापित होऊ शकते. यासाठी कला हे माध्यम चांगले काम करू शकते असे मत ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी नुकतेच व्यक्त केले. मंगेश मुव्हिज् एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘गांव थोर पुढारी चोर’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते दौंड परिसरातील वाळकी या गावात नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
अण्णा हजारे म्हणाले की, कला हे केवळ मनोरंजन नसून ते एक सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. हा दृष्टीकोन ठेवून सध्याच्या कलाकारांनी काम करणे आवश्यक आहे. आपल्या स्वतंत्र भारतात जनता ही या देशाची मालक आहे आणि पुढारी मंडळी सेवक आहेत हे चित्रच मुळात उलटे झाले आहे. ते बदलण्यासाठी अशा चित्रपटांची, साहित्यांची, कलाकृतींची समाजाला गरज आहे. यातूनच जनतेला प्रेरणा मिळेल अशी भावनाही अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.
मंगेश डोईफोडे आणि पितांबर काळे निर्मित ‘गांव थोर पुढारी चोर’ या चित्रपटाचे टी चिराग सहनिर्माते आहेत. या चित्रपटात दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शन पितांबर काळे करत आहेत. पुणे आणि दौंड परिसरात ‘गांव थोर पुढारी चोर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे.
‘गांव थोर पुढारी चोर’चा मुहूर्त अण्णा हजारे यांच्या हस्ते संपन्न
बलशाली भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर गावपातळीवर काम करणे आवश्यक आहे.

First published on: 16-05-2014 at 06:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaon thor pudhari chor marathi movie muhurt by anna hajare