२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले अन् साऱ्या जगभरात याची दखल घेतली गेली. मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, रजनीकांत, कतरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण, चिरंजीवी, रोहित शेट्टी अशा कित्येक सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली.
मराठी कलाकारांपैकी फारसं कुणी या सोहळ्याला उपस्थित नव्हतं. एखाद दूसरा कलाकारच त्यादिवशी अयोध्येत उपस्थित होता. परंतु बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दिवस साजरा केला. अशातच मराठी अभिनेता गश्मीर महाजनी याने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एक वेगळाच प्रश्न विचारला आहे. स्वतःला हिंदू म्हंटल्यावर बऱ्याच लोकांना त्याचं वाईट वाटतं ही खंत गश्मीरने व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “देशात रामराज्य…” सचिन, बिग बी व इतर सेलिब्रिटीजचा जुना व्हिडीओ शेअर करत कॉमेडीयनची खोचक टिप्पणी
गश्मीर हा त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तसेच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल वेगवेगळे अपडेट सोशल मीडियावर देत असतो. गश्मीरने केलेल्या नव्या पोस्टची मात्र जबरदस्त चर्चा झाली. या पोस्टमध्ये गश्मीरने लिहिलं, “आम्ही अत्यंत धार्मिक माणसं आहोत अन् प्रत्येक धर्माला आम्ही आपलं मानतो. पण जेव्हा आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो तेव्हा मात्र कित्येकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही फार विचित्र गोष्ट आहे.” अशी खंत व्यक्त करत गश्मीररने आणखी एक पोस्ट शेअर केली अन् त्यात त्याने हिंदू असल्याचा अभिमान असल्याचंही नमूद केलं.
वडील रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला. ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ अशा चित्रपटातून गशमीरने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली. मराठीबरोबरच हिंदी मालिका आणि चित्रपटातही गश्मीर झळकला आहे.