चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे मराठी नाटक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई-आदित्य ही लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ प्रेक्षकचं नाही तर अनेक कलाकारांनादेखील या नाटकाची भुरळ पडली. अनेक कलाकारांनी या नाटकाचे कौतुक केलं.
तसंच ‘गालिब’ (Ghalib) हे नाटक अनेक पुरस्कारांनीही सन्मामित आहे. अशातच आता या नाटकाला ‘महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव’मध्येही पुरस्कार मिळाला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२३-२४ मध्ये आयोजित ‘३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धे’च्या अंतिम फेरीत ‘मल्हार’ या संस्थेने सादर केलेल्या ‘गालिब’ नाटकासाठी गौतमी देशपांडेला रौप्यपदक पारितोषिक मिळालं आहे. याबद्दल तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
गौतमीने पुरस्कार आणि प्रमाणपत्राबरोबरचा फोटो शेअर करत या पुरस्काराबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे आणि भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “हे खूप जास्त खास आहे. कारण आजी-आजोबांना ५० वर्षांपूर्वी त्यांच्या नाटकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. मग आईला ४३ वर्षांपूर्वी मिळाला आणि आता मला हा ‘गालिब’साठी मिळाला आहे. याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. मी सध्या फक्त आनंदी आहे. ‘गालिब’ने मला खूप काही दिलं आहे. चिन्मय मांडलेकर मला ‘ईला’ ही भूमिका दिल्याबद्दल मी कायम आभारी राहीन.”

गौतमीने शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेक कलाकारांनीही तिचं या पुरस्कारानिमित्त कौतुक केलं आहे. अभिजीत खांडकेकर, आदिनाथ कोठारे, सानिया चौधरी, ऋतुजा बागवे तसंच अनघा अतुल यांसारख्या अनेक कलाकारांनी अभिनंदन म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, गौतमी देशपांडे ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक अपडेट्स शेअर करत असते. अशातच तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या ‘दोन वाजून दोन मिनिटांनी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.