दिवाळीच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही दिवाळी पहाटच्या एका कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला आहे. खुद्द गौतमीने सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली आहे.
ठाण्यातील तलाव पाळी येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सबसे कातील, गौतमी पाटीलचा खास शो ठेवण्यात आला आहे. गौतमी पाटीलने शेअर केलेल्या स्टोरीतील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. तसेच ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचाही फोटो आहे. गौतमीचा कार्यक्रम लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच म्हणजे रविवारी (१२ नोव्हेंबर रोजी) होणार आहे. “लवकरच ठाण्यात” असं गौतमीच्या स्टोरीतील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलचे कार्यक्रम तिथे होणारा गोंधळ व राड्यांमुळे चर्चेत असतात. उपराजधानी नागपूरसह अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ व हाणामारीचे प्रकार घडले होते. त्यानंतर आता तिचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात होणार आहे. त्यामुळे तिच्या या डान्स कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.