गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या सेलिब्रेटींच्या तुलनेत गौतमी पाटीलला प्रचंड मागणी असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियासह प्रत्येक माध्यमात गौतमी ही चांगलीच चर्चेत असते. आपल्या डान्समुळे गौतमी सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहत असते. आजवर तिने आपल्या अनेक कार्यक्रमांतून तिच्या नृत्याची जादू सर्वांना दाखवली आहेच. शिवाय गौतमी काही गाण्यांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

अशातच गौतमीचे एक नवीन गाणं आलं आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गौतमीने नुकतीच या गाण्याची खास झलक आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्यात ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत असून श्री कृष्णाची आराधना करताना दिसत आहे.

गौतमी पाटीलने आजवर अनेक लावण्या आणि आयटम सॉन्ग केले आहेत, त्यावर नृत्यही सादर केलं आहे. पण तिने आजवर गवळण हा नृत्यप्रकार केलेला नाही. ‘कृष्ण मुरारी’ हे तिचं पाहिलं गवळण गीत आहे. त्यामुळे तिने तिच्या पहिल्या गवळणविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. याबद्दल तिने असं म्हटलं आहे की, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली.”

गौतमी पाटीलचं ‘कृष्ण मुरारी गाणं प्रदर्शित

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी साईरत्न एंटरटेन्मेंट आणि निर्माते संदेश गाडेकर व सुरेश गाडेकर यांचे मनापासून आभार मानते. माझी कृष्णावर नितांत श्रद्धा आहे. मी दररोज कृष्णाची भक्तीभावाने आराधना करते. हे गाणं चित्रीत करताना मला खूप मज्जा आली. प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. हे पाहून आनंद झाला. माझ्यावर प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम राहो हीच सदिच्छा.”

गौतमी पाटीलचं ‘कृष्ण मुरारी गाणं प्रदर्शित

दरम्यान, ‘कृष्ण मुरारी’ गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलारने हे गाणं गायलं आहे, तर विशाल शेलार यांनी या गाण्याचं शब्दांकन केलं आहे. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. ‘कृष्ण मुरारी’ या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे. परंतु हे गाणं पाहताना वृंदावनात असल्याचा भास होतो.