महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी अजरामर केलेले ‘गीतरामायण’ आजही श्रोत्यांच्या आणि रसिकांच्या ओठावर आहे. ‘गीतरामायण’मधील गाण्यांचा गोडवा तसुभरही कमी झालेला नाही. याच गीतरामायणाच्या आविष्काराचा एक वेगळा प्रयोग नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सादर झाला. नृत्य आविष्कारातून गीतरामायण उलगडले. संध्या दामले यांच्या नृत्यदर्पण अकादमीतर्फे हा कार्यक्रम सादर झाला.
गेली अनेक वर्षे संध्या दामले या भरतनाटय़मचे प्रशिक्षण देत असून अनेक विद्यार्थिनींनी त्यांच्याकडे भरतनाटय़मचे शिक्षण घेतले आहे. त्या विद्यार्थिनींना घेऊन काही तरी वेगळा कार्यक्रम करावा, अशा विचारातून त्यांनी ‘गीतरामायण’चा नृत्याविष्कार छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांतून सादर केला होता. प्रबोधन गोरेगाव या संस्थेमुळे त्यांना पहिल्यांदाच हा कार्यक्रम मोठय़ा व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळाली.
‘पंचतुंड नररुंड माळ’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर गीतरामायणच्या अविट गाण्यांवरील नृत्याविष्काराने कार्यक्रम रंगत गेला. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती’, ‘युवतींचा संघ कुणी गात चालला’, ‘आकाशाशी जडले नाते धरती मातेचे स्वयंवर झाले सीतेचे’, ‘मार ही त्राटिका’, ‘कोण तू कुठला राजकुमार’, ‘सूड घे त्याचा लंकापती’, ‘नको करूस वल्गना’, ‘जय गंगे जय भागीरथी’, ‘अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे’ आदी गाणी नृत्याविष्कारातून सादर झाली. ‘गोपाल निरंजन’ या आरतीवर स्वत: संध्या दामले यांनी नृत्याविष्कार सादर केला आणि त्यानेचकार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात संध्या दामले यांच्या १८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या जणींनी आपापले शिक्षण, नोकरी सांभाळून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.