मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरात कौतुकास पात्र ठरलेल्या चित्रपटाचे खुद्द भारतीय कुस्तीपटू गीता फोगटनेही कौतुक केले. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा पूर्णपणे महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता-बबिता फोगट यांनी आखाडय़ातील या खेळात मिळवलेल्या प्रभुत्वावर, त्यांच्या संघर्षांवर आधारित आहे. भारतीय कुस्तीपटू गीताने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गीता म्हणाली की, ‘दंगल’ हा चित्रपट ९९ टक्के आमच्या जीवनावर भाष्य करतो. पण संपूर्ण चित्रपट पाहताना चित्रपटातील एका सीनने माझ्या आनंदावर विरझन घातले. असे ती म्हणाली.
या चित्रपटामध्ये गीता आणि महावीर फोगट यांच्यातील कुस्ती दाखविण्यात आली आहे. या सीनवर गीताने भाष्य केले. सर्व चित्रपटाचा मी आनंद घेतला, मात्र वडिलांसोबत आखाड्यात कुस्तीच्या सीनचा मी आनंद घेऊ शकले नाही. हा सीन पाहताना मी भावनिक झाले होते. माझ्या वडिलांसोबत एक दोनवेळा नव्हे तर अनेकवेळा आखाड्यामध्ये कुस्ती खेळले, ते आमची अनेकदा आखाड्यात परिक्षा घेत. मात्र चित्रपटातील या सीनने मी वडिलांसोबत पहिलवानासारखे वागल्याची जाणीव झाली. असे गीताने म्हटले. यावेळी तिने चित्रपटातील सर्वाधिक आवडलेल्या सीनवर देखील भाष्य केले. राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेदरम्यान दाखविण्यात आलेले सीन सर्वाधिक आकर्षित करणारे होते, असे गीता म्हणाली. आयुष्यातील भाविनिक आणि संघर्षमयी क्षणांना जगासमोर आणणाऱ्या आमिर खानचेही तिने आभार मानले. तसेच आमिरसोबतच गीताने ‘दंगल’ चित्रपटाच्या टीमचे देखील कौतुक केले.
गेले वर्षभर प्रेक्षक आमिर खानच्या ज्या चित्रपटाची वाट पाहत होते तो सगळीकडे प्रदर्शित झाला आणि निश्चलीकरणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचे सावट असतानाही अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने १३२.४३ कोटी रुपयांची ‘दंगल’ केली आहे. या वर्षी प्रदर्शित झाल्यापासून चार दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे. सलमान खानच्या ‘सुलतान’चा विक्रम या चित्रपटाला मोडता आलेला नसला तरी हा आठवडा सगळी चित्रपटगृहे ‘दंगल’साठीच असल्याने एकंदरीत कमाईमध्ये आमिर पुढे जाईल, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांचा आहे.