स्टार प्लसवर लवकरच सेलिब्रिटी कपल डान्स शो म्हणजे ‘नच बलिये’चे नवे पर्व सुरु होणार आहे. या शोमध्ये दर दिवशी सहभागी होणाऱ्या नवनवीन जोडप्यांची नावे समोर येत आहेत. आतापर्यंत आगामी पर्वातील दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंग, करन पटेल यांची नावे समोर आली आहेत. पण आता कुस्तीपटु गीता फोगट हिनेही या पर्वात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. ‘गीता’ या व्यक्तिरेखेच्या भोवतीच ‘दंगल’ सिनेमाचे कथानक फिरताना दाखवण्यात आले होते. ‘दंगल’ सिनेमामुळे पुन्हा एकदा फोगट बहिणी चर्चेत आल्या होत्या. याशिवाय कपिल शर्मा शोमध्ये ही गीता पाहुणी म्हणून गेली होती. या शोमध्ये फक्त तिच नाही तर संपूर्ण फोगट कुटुंबियही सहभागी झाले होते.
पण आता येणारे ‘नच बलिये’चे हे ८ वे पर्व इतर पर्वांपेक्षा वेगळे असणार आहे. जर या शोमध्ये येण्यासाठी गीताने होकार दिला तर तिला तिचे नृत्य कौशल्य सुधारावे लागेल. गीतासोबत तिचा नवरा पवन कुमारही सहभागी होणार आहे. पवन स्वतः एक कुस्तीपटू आहे.
त्यामुळे या पर्वात गीता, कुस्तीच्या रिंगणात जशी प्रतिस्पर्ध्यांना हरवते, त्याचप्रमाणे नृत्याच्या रिंगणातही हरवणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल यात काही शंका नाही. गीताशिवाय मोनालिसा आणि तिचा नवरा विक्रांत सिंग राजपूतही या पर्वात एक स्पर्धक म्हणून दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, ‘दंगल’ सिनेमाविषयी आमिर म्हणाला होता की, या सिनेमातील माझी भूमिका ही फार आकर्षित करणारी अशी नाही. तसेच या सिनेमात रोमान्सची किनार देखील दिसत नाही. या गोष्टी नसताना देखील सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमाला एवढे मोठे यश मिळेल, असा विचार मी किंवा ‘दंगल’च्या टीमने कधीच केला नसल्याचेही आमिरने सांगितले होते.
आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमाच्या यशाविषयी आणखी सांगायचे तर आमिरने नुकतीच ‘दंगल’च्या यशाची आणखी एक धमाकेदार पार्टी दिल्याचे पाहायला मिळाले होते. आमिरच्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावल्याचे दिसले होते. या पार्टीत आमिरची मुलगी इरा खानसोबतच ‘दंगल’मधील आमिरच्या मुलींनी देखील हजेरी लावली होती. फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते.