‘सुपरहीरो सिंड्रोम’ नामक विकार झालेल्या व्यक्ती आपल्यात काहीतरी दैवी, अचाट शक्ती आहे, आपल्यात चमत्कार घडवण्याची ताकद आहे या भ्रमात वावरत असतात. सध्या गल्लीबोळात फोफावलेले बाबा, बापू, महाराज हे या विकाराचेच बळी आहेत. त्यांच्या भजनी लागलेले लोक हेही वैफल्यग्रस्त, न्यूनगंडाने पछाडलेले, आत्मविश्वास गमावलेले आणि स्वत:च्या बलस्थानांबद्दल अनभिज्ञ असलेले असे विकारग्रस्तच असतात. या दोन्ही जमाती बिलकूल सुधारणे शक्य नसते. परंतु या दोन्ही गटांत न मोडणारे आणि तरीही स्वसामर्थ्यांबद्दल अवास्तव कल्पना बाळगून आयुष्य वाया दवडणारे लोक हे मनोविकारतज्ज्ञांकडून यथायोग्य उपचार मिळाल्यास नक्कीच बरे होऊ शकतात. परंतु मुळात आपल्याला हा विकार आहे हे समजून घेणं आणि नंतर त्यावर उपाय करणं- याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. अशा माणसाची गणना वेडय़ात करून त्याला वाऱ्यावर सोडलं जातं. तर ते असो. लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अशा विकारग्रस्ताला केन्द्रस्थानी ठेवून रचलेलं नाटक म्हणजे- ‘गेला उडत!’ केदार शिंदे यांनाही फॅन्टसीचा विकार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. त्यांची बहुसंख्य नाटकं ही फॅन्टसीवरच आधारीत असतात. एखाद् दुसरा अपवाद. पण त्यांनी ‘गेला उडत!’मध्ये एक पथ्य हेतुत: पाळलंय- यातल्या फॅन्टसीला त्यांनी वास्तवाचं कोंदण दिलंय. सबब त्यांचा हा विकारगुन्हा माफ आहे.
सुपरहीरो सिंड्रोमचा बळी असलेल्या मारुतात्मज या तरुणाच्या उपद्व्यापांनी घरची मंडळी हैराण झालेली असतात. सदान्कदा सुपरमॅनच्या पेहरावात आणि आवेशात वावरणाऱ्या मारुतीला कसा आवरावा, हा त्यांच्यापुढचा कायम प्रश्न असतो. तसा मारुती मनाने साधाभोळा, सरळ आहे. लोकांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे. परंतु ही मदत करत असताना तो अनेकदा भलता घोळ घालून ठेवतो. मग तो निस्तरताना मारुतीच्या घरच्यांना नाकी दम येतात. त्याच्या या सततच्या उपद्व्यापांना कंटाळून त्याची वहिनी स्वतंत्र बिऱ्हाड करायचं ठरवते. पण सुहासला (मोठा भाऊ) ते मान्य नसतं. धाकटा भाऊ किरणला प्रेयसी संध्याबरोबर लग्न करायचं असतं. त्यांचं लग्न लावून देऊन मारुतीला त्यांच्या गळ्यात टाकून आपण मोकळं व्हायचं असा वहिनीचा इरादा असतो. परंतु किरणलाही हे घोंगडं गळ्यात नको असतं. सगळ्यांनाच आपण नकोसे झालो आहोत हे कळल्यानं मारुती विजेच्या उघडय़ा बटणाला हात लावून स्वत:ला संपवायचा प्रयत्न करतो. त्याला मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं. परंतु डॉ. सायली मारुतीचा आजार पाहता त्याला त्याच्याच कलाने वागवून ‘नॉर्मल’ करता येईल असं मारुतीच्या घरच्यांना सांगते. त्यानुसार सर्वजण वागायचं ठरवतात. त्याला सुपरहीरो म्हणून स्वीकारून त्याची प्रत्येक गोष्ट खरी मानू लागतात. परंतु या असल्या अतार्किक उपायांना फळ कसं येणार, असंही त्यांना एकीकडे वाटत असतंच.
तशात किरणच्या प्रेयसीचा- संध्याचा गुंड भाऊ पक्याभाई त्यांच्या प्रेमात आडवा येतो. तो किरणच्या घरी येऊन त्यांना धमकावतो, की उद्यापर्यंत तुम्ही हे घर सोडून गेला नाहीत तर तुमची खैर नाही. एकेकाचे मुडदे पाडेन. खंडणी, खून आदी गुन्ह्य़ांत गळ्यापर्यंत बुडालेल्या पक्याभाईच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे सारेच उमजून असतात. पण मारुती मात्र पक्याभाईला सुपरहीरोच्या आवेशात ठसन देतो की, आम्ही तर हे घर सोडणार नाहीच, पण तुलाच उद्या तुझ्या अड्डय़ावर येऊन मी तिथून हाकलून काढतो की नाही बघ. पक्याभाईच्या एका पंटरला मारुतीची सुपरपॉवर माहीत असते. त्याचा प्रत्ययही त्यानं घेतलेला असतो. तो भाईला समजवायचा खूप प्रयत्न करतो, पण भाई त्याला उडवून लावतो. धमकी देऊन भाई गेल्यावर घरचे सारे मारुतीवर तुटून पडतात. त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून देऊ पाहतात. पण सुपरहीरो सिंड्रोममध्ये आकंठ बुडालेल्या मारुतीला त्याची फिकीर नसते. सुहास त्याच्या कानाखाली आवाज काढून शेवटी त्याला भानावर आणतो. तू आमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहेस, तू त्या भाईचं काहीही वाकडं करू शकत नाहीस, हे त्याला बजावतो. मारुतीला आपलं सामान्यपण पहिल्यांदाच जाणवतं. त्यामुळे आता उलटय़ा दिशेनं त्याचा प्रवास सुरू होतो. तो सामान्यत्वाच्या कोषात जातो. डॉ. सायली त्याला त्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करते. ती त्याला समजावते, की तू सामान्य असलास म्हणून काय झालं? हिंमत धरलीस तर तू पक्याभाईलाही सरळ करू शकतोस. नक्कीच.
..दुसऱ्या दिवशी मारुती थेट पक्याभाईच्या अड्डय़ातच घुसतो. पुढे काय होतं, हे इथं सांगण्यात अर्थ नाही. ते नाटकात पाहणंच उचित.
लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या यापूर्वीच्या अद्भुतरम्य नाटकांची आठवण व्हावी असंच हे नाटक आहे. विशेषत: ‘लोच्या झाला रे’ची! त्यात सिद्धार्थ जाधव एपमॅनच्या भूमिकेत होते. त्यानंतर प्रदीर्घ खंडानंतर त्यांचं पुनश्च त्याच पठडीतल्या, पण सुपरमॅनच्या अवतारात या नाटकात आगमन झालं आहे. तसाच त्यांचा हैदोसधुल्ला याही नाटकात पाहायला मिळतो. केदार शिंदे हे अद्भुतरम्य नाटकांचे मास्टर आहेत. साहजिकच आपल्या या होम ग्राऊंडवर त्यांनी तुफानी बॅटिंग केली आहे. ती करताना मारुतात्मज नावाचा कुणीही सुपरमॅन अस्तित्वात नाही, हे प्रेक्षकांवर सतत ठसत राहील याचीही दक्षता त्यांनी घेतली आहे. ती फार महत्त्वाची आहे. बाकी मग प्रसंगनिष्ठ विनोद आणि इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं नाटक फुलवत नेण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही, हे सर्वज्ञात आहेच. इथेही त्यांच्या त्या हातखंडा जादूच्या प्रयोगाचा प्रत्यय येतो. त्याला नाचगाण्यांची जोड देऊन प्रेक्षकांच्या रंजनात कसलीच कसर त्यांनी सोडलेली नाही. तक्रार एवढीच, की नाटकातली सर्व पात्रं कायम हाय पिचमध्येच बोलतात. हा ‘कानठळ्या प्रयोग’ (संगीत-पाश्र्वसंगीतातही!) ते थोडय़ा लो पिचमध्ये आणते तर बरं झालं असतं. त्यामुळेच यातलं न बोलणारं वडिलांचं मूक पात्र फारच उठून येतं. स्लॅपस्टिक कॉमेडीचाही उत्तम वापर त्यांनी केलेला आहे. ध्वनिसंकेतांना यात महत्त्वाचं स्थान आहे. कलाकारांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्यात केदार शिंदे नेहमीसारखेच इथंही यशस्वी झाले आहेत. नाटकाचं र्अध यश त्यात आहे. एक आहे- की इतक्या वर्षांत त्यांच्या विनोदाच्या ‘प्रेडिक्टेबल’ जागा नित्याच्या प्रेक्षकांच्या हटकून ध्यानी येतात. त्याबरोबरीने धक्कातंत्राच्या सुखद जागाही यात आहेत.
ravi05
प्रदीप मुळ्ये यांनी अनेक नाटय़स्थळांची मागणी वास्तवदर्शी तसंच अद्भुततासूचक लवचिक नेपथ्यातून यथार्थतेनं पुरवली आहे. साईप्रसाद निंबाळकर आणि पियुष कुलकर्णी यांचं हार्ड रॉक धर्तीचं संगीत नाटकाच्या प्रकृतीशी पूरक आहे. शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटय़ावकाशातील नाटय़ उजळवते. ओंकार मंगेश दत्त यांची गीते ठसकेबाज आहेत. नाटकाची गतिमानता त्याने वृद्धिंगत होते. सोनिया परचुरे आणि सॅड्रिक डिसुझा यांचे नृत्यआरेखन ठेका धरायला लावणारे आहे. युगेशा-ओंकार (वेशभूषा) आणि बिपीन येरुणकर (रंगभूषा) यांचाही या नाटकाच्या यशस्वीतेत मोलाचा वाटा आहे.
सिद्धार्थ जाधव यांनी मारुतात्मजच्या भूमिकेत यात जे धुमशान घातलं आहे त्याला तोड नाही. त्यांच्या फुसांडून उसळणाऱ्या ऊर्जेचा प्रत्यय तर इथं येतोच; शिवाय त्यांच्या नियंत्रित (कंट्रोल्ड) अभिनयाचंही उत्तम दर्शन घडतं. अडखळत संवादोच्चारणाची त्यांची शैली मारुती या पात्राला अस्सलता प्राप्त करून देते. ‘लोच्या’नंतरची त्यांची ही आणखी एक संस्मरणीय भूमिका! सुमित सावंत यांनी बापाच्या मूक भूमिकेतही लक्षवेधी पराक्रम केला आहे. डॉ. सायली आणि पक्याभाई ही पात्रं वगळता अन्य पात्रांना वास्तवदर्शी अभिनयाबरोबरच अर्कचित्रात्मक अभिनयाचंही कसब यात दाखवावं लागलेलं आहे. त्यातही ते कुठंच कमी पडत नाहीत. श्वेता घरत-बर्वे (वहिनी), घनश्याम घोरपडे (सुतावणे), गणेश जाधव (सुहासदादा), किरण नेवाळकर (किरण), गौरव मोरे (पंटर १), सचिन गावडे (पंटर २), अमिर तडवळकर (पक्याभाई), अर्चना निपाणकर (डॉक्टर सायली), सुरभी फडणीस (संध्या) या सर्वानीच आपली कामं चोख केली आहेत.
निखळ करमणुकीचा गावरान तडका असलेलं हे नाटक केवळ रंजनासाठी नाटक बघणाऱ्यांचे पैसे शंभर टक्के वसूल करतं यात तीळमात्र शंका नाही.
रवींद्र पाथरे

nashik save ganga ghat marathi news
गंगाघाट नेस्तनाबूत करण्यास नाशिक वाचवा कृती समितीचा विरोध
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
Yavatmal, accident, car hit truck,
यवतमाळ : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार जण ठार, एक गंभीर
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी
newborn baby girl killed by father
नवजात जुळ्या मुलींचा वडिलांकडून खून; मुलाच्या हव्यासापोटी क्रूर कृत्य
Satara, Satara Protest against Illegal Tree Cutting, Tree Cutting , Innovative Campaign, Rajpath satara, marathi news
राजपथावरील झाडे तोडणाऱ्याबद्दल साताऱ्यात संताप, हरित साताराचे अभिनव आंदोलन
Accused in Miraroad extortion case in touch with Dawoods brother
मिरारोड : खंडणी प्रकरणातील आरोपी दाऊदच्या भावाच्या संपर्कात