बॉलिवूडच्या काही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर चमकतात आणि काही ना काही कारणाने अचानक रुपेरी पडद्यावरुन, बॉलिवूडमधून काही काळासाठी गायब होतात. बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री जेनेलिया डिसुझा काही चित्रपटांनतर गायब झाली होती. मात्र आता लवकरच ती पुन्हा एकदा ‘कमबॅक’ करत आहे. दस्तुरखुद्द जेनेलियानेच प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
बॉलिवूाडमध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या एखाद्या अभिनेत्रीचे चित्रपट चालले आणि प्रसिद्धी मिळाली की काही जणींना त्यापासून दूर राहणे शक्य होत नाही. मात्र काही अभिनेत्री लग्न आणि मूल झाल्यानंतर जाणीवपूर्वक काही काळासाठी रुपेरी पडद्यापासून दूर राहतात. ऐश्वर्या राय-बच्चन हे त्याचे अलिकडचे उदाहरण आहे.
‘जाने तू या जाने ना’ आणि ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या दोन चित्रपटानंतर जेनेलियाला जेवढी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी तिने रितेश विलासराव देशमुख याच्याशी लग्न केल्यानंतर मिळाली. रितेशशी लग्न केल्यानंतर जेनेलिया रुपेरी पडद्यापासून लांबच राहिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रितेश व जेनेलिया यांना मुलगा झाला. त्यामुळेही मुलाच्या संगोपनात व्यग्र असल्याने ती चित्रपटापासून दूर होती.
मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात जेनेलिया उपस्थित होती. या वेळी तिला रुपेरी पडद्यावर कधी परतणार? असा प्रश्न विचारला असता,   मी बॉलिवूड सोडलेले नाही. मी सध्या सुट्टीवर आहे. मला पुन्हा ‘कमबॅक’ करायचे आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करण्यासाठी आपण तयार असल्याचे जेनेलियाने सांगितले होते. जेनेलिया आता कोणत्या चित्रपटाद्वारे पुन्हा बॉलिवूडमध्ये परत येतेय, याबाबत तिच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

Story img Loader