दोन नाही, चार नाही तर तब्बल साडेबारा तासांच्या चार डीव्हीडीज, त्यामध्ये १०१ पूर्ण तर साडेपाचशे अंशत हिंदी चित्रपटगीते. एवढंच नाही, तर ही गीते ज्यांच्यावर चित्रित झाल्येत त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा, त्यांचे किस्से-आठवणी..! येत्या तीन मे या दिवशी शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीला अभिवादन करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या शेमारू एन्टरटेनमेंट लि. या कंपनीने ‘१०१ सिल्व्हर स्क्रीन स्टार्स’ या डीव्हीडी संचाचा घाट घातला आहे. गेल्याच वर्षी या कंपनीने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला, या औचित्याचीही किनार या प्रयोजनाला आहे.
तीन मे १९१३ या दिवशी दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिलावहिला बोलपट आपल्या देशात प्रदर्शित झाला. त्यानंतर हे झपाटलेपण अनेक कलाकारांनी घेतले. उत्तरोत्तर शेकडो-हजारो चित्रपटांची निर्मिती होत गेली. कला आणि व्यवसाय याचा उत्तम मिलाप आपल्या चित्रपटांमध्ये झाला. आपल्या मायबाप प्रेक्षकांवर चित्रपटांनी किती भुरळ घातली आहे, हे वेगळं सांगायला नको. चित्रपटांतील नायक-नायिकांमध्ये स्वतला पाहत, त्यांच्या सुखदुखात सहभागी होत अनेक पिढय़ांची भावविश्वे फुलली! राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार आदी अभिनेते व नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन, वैजयंतीमाला आदी अभिनेत्री लाखो-कोटय़वधी रसिकांची दैवते झाली. या कलाकारांमधील प्रमुख १०१ प्रतिनिधींचा या डीव्हीडीमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांची थोरवी सांगण्यासाठी अर्थातच दृक्-श्राव्य गाण्यांचा आधार घेण्यात आला आहे. गीत-संगीत हे आपल्या चित्रपटसृष्टीचे आणखी एक वेगळेपण असल्याने गाण्यांच्या माध्यमातून विविध कलाकारांची वैशिष्टय़े अनुभवणे आनंदाचे ठरते. ही गाणी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याने या निमित्ताने ती पाहाताना गतस्मृती जाग्या होतात, पुनप्रत्ययाचा आनंद मिळतो, हिंदी चित्रपटांचा इतिहास डोळ्यांसमोर अलगदपणे उलगडत जातो. राज कपूरपासून रणबीर कपूपर्यंत व नर्गिसपासून विद्या बालनपर्यंतच्या नायक-नायिकांचा चित्रपटीय प्रवास यात उलगडून दाखवला आहे. प्रत्येक गाण्यापूर्वी त्या-त्या नायक-नायिकेच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे. यात त्यांचे पदार्पण, कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे, लाभलेले पुरस्कार आदी माहिती देण्यात आली आहे.
खटकणारी गोष्ट म्हणजे, यात राजकुमार, राजेंद्रकुमार, धर्मेद्र, जितेंद्र, फरदीन खान, विवेक ओबेरॉय, सुनील शेट्टी, शाहीद कपूर, शिल्पा शेट्टी अशा काहीसुमार कलाकारांचा समावेश झालेला असताना चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्राण व अशोककुमार या कलावंतांना मात्र वगळण्यात आलं आहे. (नाना पाटेकर, अमरिश पुरी, अनुपम खेर यांनाही यात स्थान नाही.) या दोन ज्येष्ठ कलाकारांच्या वाटय़ाला फारशी गाणी आली नसल्याने कदाचित हा प्रकार घडला असेल. मात्र, अशोककुमार यांचं ‘रेलगाडी’ (चित्रपट-आशीर्वाद) व प्राण यांचं ‘यारी है इमान मेरा’ (चित्रपट-जंजीर) ही गाणी यात घेतली असती तर अधिक सयुक्तिक ठरलं असतं. दोघांचं मिळून ‘दो बेचारे बिना सहारे’ (चित्रपट- व्हिक्टोरिया नंबर २०३) हे गाणंही घेता आलं असतं, असो. दुसरं म्हणजे, अमिताभ (पग घुंघरु बांध- नमक हलाल), शशी कपूर (प्यार तो एक दिन होना था- एक श्रीमान एक श्रीमती), विनोद खन्ना (ये खिडकी जो बंद रहती है- मै तुलसी तेरे आंगन की), राजेश खन्ना (जिंदगी के सफर में- आप की कसम), विनोद मेहरा (कैसे जी लेते है- साजन बिना सुहागन), किशोरकुमार (हम तो मोहब्बत करेगा- दिल्ली का ठग) यांची ही गाणी यात आहेत. जी, या कलाकारांची सर्वोत्तम गाणी आहेत, असं कोणी म्हणू शकणार नाही. अर्थात, यामुळे या सर्वागसुंदर अल्बमला उणेपणा येत नाही. या सोबत देण्यात आलेली एक डायरीही वाचनीय व संग्राह्य़ आहे. या डायरीच्या पानोपानी अनेक चित्रपटांच्या निर्मितीदरम्यानचे किस्से वाचण्यास मिळतात.
चित्रपट, त्यातील प्रसंग, संवाद, गाणी या साऱ्यांनी तुम्हा-आम्हा सर्वाना झपाटून टाकलं आहे. रोजच्या जगण्यातही याचे अनेक संदर्भ गवसतात. हा अल्बम पाहताना याचा सहज प्रत्यय येतो. या कलाकारांना आपण कधी भेटलेलोही नसतो, तरीही या गाण्यांशी-चित्रपटांशी संबंधित आपल्या काहीतरी आठवणी असतात. तीच या माध्यमाची किमया आहे! चित्रपट म्हणजे प्रत्येकाची कहाणी, पडद्यावर साकारणारं प्रेक्षकांचं स्वप्न.. सब की कहानी, सबका है  सपना!
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉइंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)
माधुरीकडूनही कौतुक
चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने असा संच काढण्याची अभिनव कल्पना सुचणे व ती प्रत्यक्षात उतरणे, हा आगळावेगळा योगच. हा योग कसा जुळून आला, या विषयी ‘शेमारू’चे संचालक हिरेन गाडा यांना बोलतं केलं. ते म्हणाले, ‘आपल्या अभिनेते व अभिनेत्रींनी केवळ या चित्रपटसृष्टीलाच समृद्ध केलं नाही तर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही बरंच काही दिलं आहे. या कलाकारांचं वलय, फॅशन याचं प्रतिबिंब समाजात उमटलेलं दिसतं. आपली दुखं त्यांनी हलकी केली. त्यामुळे चित्रपटसृष्टीच्या शतकाच्या निमित्ताने या कलाकारांच्या कर्तृत्वाची नोंद घेतली जावी, असं आम्हाला वाटलं. हा अल्बम अविस्मरणीय व्हावा, यासाठी आमच्या टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. १०१ कलाकार व त्यांची गाणी निवडणे, हे मोठं आव्हान होतं. त्यासाठी आमच्या पाच अधिकाऱ्यांनी सात महिने संशोधन केलं, तब्बल दोन हजार चित्रपटांचा आढावा घेतला. तीन-चार पिढय़ांना जोडणारा हा अल्बम परिपूर्ण आणि संग्राह्य़ झालाय, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. या अल्बमचं रसिकांनी जोरदार स्वागत केलं आहे; एवढंच नव्हे, तर माधुरी दीक्षित, नसिरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार व अनेक दिग्दर्शकांनीही आमची पाठ थोपटल्ये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा