सुट्टीचे दोन महिने म्हणून एप्रिल-मे महिन्यांत अनेक मराठी-हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी तयारीत असतात. मात्र गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ने सगळय़ांचीच झोप उडवली. इतर कोणत्याही हिंदी चित्रपटांसारखा फारसा गाजावाजा न करता प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची गर्दी खेचून घेतली. त्यामुळे त्यानंतर महिनाभर कोणत्याही हिंदी चित्रपटाला चित्रपटगृहात फारसे चांगले शो मिळाले नाहीत. या सगळय़ाचा मोठा फटका नेहमीप्रमाणे मराठी चित्रपटांना बसला आणि त्यांचे प्रदर्शन पुढे गेले. मुळात जून-जुलै महिन्यात मोठय़ा हिंदी चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा आधीच जाहीर केल्या असल्याने गेल्या महिन्यात रखडलेले मराठी चित्रपट आणि नवे हिंदी चित्रपट असे दर आठवडय़ाला चार ते पाच चित्रपट पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली आहे.‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. त्यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आधीपासूनच चित्रपटगृहात सुरू होता. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘द केरला स्टोरी’बरोबर ‘बलोच’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्याआधी ‘टीडीएम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटगृह मिळत नाही म्हणून हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घेण्यात आला. याशिवाय, ‘रावरंभा’, ‘फकाट’ आणि देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ असे तीन चित्रपट ओळीने मे महिन्यात प्रदर्शित होणार होते. त्यापैकी ‘रावरंभा’ या चित्रपटाने सुरुवातीलाच मराठी चित्रपटांशीच स्पर्धा नको म्हणून आपल्या प्रदर्शनाची तारीख १२ मे वरून २६ मे केली होती. हा चित्रपट ठरल्याप्रमाणे प्रदर्शित झाला. मात्र पुढे गेलेले दोन्ही ‘फकाट’ आणि ‘चौक’ हे मराठी चित्रपट जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय, मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. एकाचवेळी दोन-तीन मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हॉलीवूडपट आणि हिंदीतील नवे मोठे चित्रपट अशी एकच गर्दी जून-जुलै महिन्यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा