कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेत आता अमृताचा नवीन प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासामध्ये अण्णा आणि माई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अण्णांनी अमृताला तिचं करिअर करण्याची संधी दिली असून ते आता अमृताला पेढीवर बसून जेमोलॉजिचे धडे देत आहेत. तसेच बाकीच्या छोट्या – मोठ्या गोष्टी देखील शिकवत आहेत. या सगळ्यामध्ये वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत. परंतु माई आणि अण्णांच्या साथीने अमृता त्यांच्यावर मात करून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.
नुकताच मालिकेमधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला कि, घरातल्या सुनांना मुलींसारखेच वागवा, त्यांना त्यांचे हक्क, अधिकार द्या. आणि म्हणूनच अमृताला घाडग्यांच्या पेढीवर बसण्याचा मान मिळाला. आता त्याच्याच पुढे अजून एक पाऊल उचलण्याचा निर्णय माईनी घेतला आहे. अमृताला तिचे स्वत:चे अस्तित्व आणि ओळख निर्माण करण्यासाठी माई आणि अण्णा अमृताला त्यांच्याकडून जितका होईल तितका आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच साडी अथवा मंगळसूत्र अश्या कुठल्याही बंधनात न अडकता आता अमृताने तिची ओळख निर्माण करावी असे त्यांचे म्हणणे आहे. घरातील स्त्रीने बाहेर पडताना कुंकू, टिकली, मंगळसूत्र, जोडवी घालावीत छान साडी नेसून बाहेर पडावं असा समज आहे. परंतु अमृताबद्दल माई आणि अण्णांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता एका नव्या रुपात अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा : दुबईतही ‘संजू’ची क्रेझ; प्रेक्षकांसाठी २४ तास सुरू राहणार चित्रपटगृहे
घरातील स्त्रीने साडीच नेसायला हवी, मंगळसूत्र, टिकली लावायला हवी या विचारांमध्ये आणि समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासून होणे महत्वाचे आहे, असे माईचे म्हणणे आहे. त्याचीच सुरुवात माई आणि अण्णांनी केली आहे. पेढीची जबाबदारी सांभाळताना कामाला जाताना अमृताने साडी, मंगळसूत्र असे सगळे घालून बाहेर न जाता तिला अनारकली, पंजाबी, अथवा सलवार सूट घालण्याची परवानगी दिली आहे.
अमृताला आता माई आणि अण्णांची साथ मिळाली आहे. अमृता आता घर आणि पेढी कशी सांभाळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.