चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे नवंकोरं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय जोडी सई व आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी पाहायला मिळत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच ‘गालिब’ हे नाटक पाहून चिन्मय मांडलेकरच्या जवळच्या व्यक्तीने कमेंट केली आहे. सध्या त्याचा फोटो व्हायरल होत आहे.
चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात तिने शिल्पा चोगलेच्या कमेंटचा फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : कुशल बद्रिकेने दिले ‘पांडू २’ चित्रपटाचे संकेत, विजू माने म्हणाले “आता तू म्हणतोस तर…”
शिल्पा चोगलेची कमेंट
“आज मी ‘गालिब’ हे नाटक पाहिलं. मला प्रामाणिकपणे सांगावंस वाटतं की मी गेल्या कित्येक दिवसात इतकी सुंदर कलाकृती पाहिलेली नाही. मी हे नाटक पाहण्यासाठी कोणत्याही आशा-अपेक्षा न ठेवता आली होती. पण ज्याप्रकारे सर्व कथा उलगडत गेली, ते पाहणं खरंच खूप छान होतं.
‘गालिब’ या नाटकाचं लिखाण अतिशय सुंदररित्या करण्यात आलं आहे. त्याबरोबरच या नाटकासाठी कलाकारांची केलेली निवडही अगदी योग्य आहे. ‘गालिब’ या नाटकात सर्व काही आहे. गूढ गोष्टी, विनोद, वेदना, नात्यातील बारीकसारीक बारकावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक आशा की शेवटी सर्व काही चांगले होईल ही…!! या नाटकाच्या लिखाणासाठी आणि दिग्दर्शनासाठी मला चिन्मयचे खूप खूप आभार मानायचे आहेत. त्याबरोबरच नेहा तू या नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वीरित्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले”, त्यासाठी तुझेही अभिनंदन, असे तिने यात म्हटले आहे.
त्यावर नेहा जोशीने प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही हे नाटक पाहिल्याबद्दल आणि त्याचे कौतुक केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात तेव्हा नेहमीच आनंद होतो. पण जेव्हा प्रेक्षकांमध्ये आपल्या जवळचे व्यक्ती बसलेले असतात आणि त्यांच्याकडून टाळ्या मिळतात तेव्हा त्या आणखी खास असतात”, असे म्हटले आहे. तसेच यावर “शिल्पा तुझे खरंच खूप आभार”, अशी कमेंट चिन्मय मांडलेकरने केली आहे.
आणखी वाचा : बिग बींबरोबर जाहिरातीत झळकल्यानंतर हेमांगी कवीची हिंदी मालिकेत वर्णी, प्रोमो आला समोर
दरम्यान चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या नाटकात विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. ५ नोव्हेंबरपासून या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर सुरु झाले. या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रंगला.