अभिषेक तेली
लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आदी विविध बाजू समर्थपणे सांभाळणारं नाव म्हणजे ‘चिन्मय मांडलेकर’. मराठीतील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत चिन्मय मांडलेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांची यशस्वी घौडदौड सुरू आहे. चिन्मय मांडलेकर लिखित – दिग्दर्शित आणि अष्टविनायक प्रकाशित, मल्हार वज्रेश्वरी निर्मित ‘गालिब’ हे नवंकोरं मराठी नाटक आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून या पार्श्वभूमीवर चिन्मय मांडलेकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
‘गालिब’ या नाटकाचं कथानक आणि नाटकामधील भूमिकांबद्दल काय सांगाल?
‘गालिब’ हे नाव वाचल्यानंतर अनेकांना वाटलं होतं की हे नाटक मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु हे नाटक म्हणजे पुण्यातील एका कुटुंबाची काल्पनिक गोष्ट आहे. या कुटुंबातील इला नावाच्या मुलीचे वडील मानव किर्लोस्कर हे खूप मोठे साहित्यिक होते. मिर्झा गालिब यांच्यावर कादंबरी लिहिणं हे मानव किर्लोस्कर यांचं खूप मोठं स्वप्न होतं, असं नेहमी म्हटलं जायचं. त्यामुळे त्यांनी ती कादंबरी लिहिली की नाही, याबाबत त्यांच्या मृत्यूनंतर अनेक मतमतांतरं आहेत. त्यामध्ये इला, तिची बहीण रेवा आणि सध्या एक प्रथितयश लेखक असणारा मानव किर्लोस्कर यांचा एक जुना शिष्य अंगद या पात्रांच्या माध्यमातून नाटक घडत जातं. या सर्वाच्या नातेसंबंधांची गोष्ट ‘गालिब’ या नाटकातून मांडलेली आहे. या नाटकात इला हे पात्र गौतमी देशपांडे साकारते आहे. अंगदच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी, तर इलाची मोठी बहीण रेवाचे पात्र अश्विनी जोशी आणि मानव किर्लोस्कर यांचे पात्र गुरुराज अवधानी साकारत आहेत.
‘गालिब’ हे नाटकाचं नाव ठेवण्यामागचं कारण काय? आणि आजच्या काळाशी या नाटकाचा संबंध कसा जुळला आहे?
नाटकामध्ये ‘गालिब’ हे एक रूपक म्हणून वापरलेलं आहे. त्यामुळे हे नाटक पाहिल्यानंतर ‘गालिब’ हेच नाव का ठेवलेलं आहे हे तुम्हाला कळेल याची मला खात्री आहे. मला असं वाटतं की हे नाटक सर्वकालीन आहे. कारण काही भावना या आज, उद्या आणि येणाऱ्या दोनशे वर्षांनंतरही सारख्याच राहतात. जसं ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक कोणत्याही काळात दाखवा, ते तितकंच कालसुसंगत आहे. त्यामुळे मी ‘गालिब’ या नाटकाचा प्रयोग आज किंवा काही वर्षांनंतर सादर केल्यानंतरही ते त्या काळातील लोकांनाही जोडून घेणारं असेल.
मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमध्ये लेखक, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून तुम्ही सक्रिय आहात, या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करताना येणारी आव्हाने कोणती?
मी एका वेळेला एकच काम करतो, पण होतं असं की एक काम संपल्यानंतर त्यातून दुसरं काम निघतं. गेले दीड वर्षे मी रंगभूमीपासून थोडासा लांब होतो. कारण दूरचित्रवाहिनी, चित्रपट आणि वेब मालिकांवर माझं जास्त लक्ष केंद्रित झालं होतं. त्यामुळे मी या सर्व माध्यमांमध्ये वर्षभर जरा अधिक वेळ काम केलं. पण आता मोकळा वेळ मिळाल्यानंतर पुन्हा रंगभूमीकडे परतलो आहे आणि ‘गालिब’ हे नाटक करतो आहे. प्रत्येक माध्यमांची वेगवेगळी आव्हानं आहेत. व्यावसायिक नाटक करताना आपला प्रेक्षक कसा आहे, आपली नाटय़गृहं कशी आहेत याचं भान ठेवूनच नाटक करावं लागतं. मालिका करताना वाहिन्यांच्या मागण्यांचं भान ठेवावं लागतं आणि चित्रपट करताना आजूबाजूला नेमकं काय घडतंय याचं भान ठेवणं आवश्यक आहे. कारण आपल्या चित्रपटाचा सामना हा हिंदी, दाक्षिणात्य आणि परदेशी चित्रपटांशी आहे. त्यामुळे त्यांच्या तुलनेत आपलं बजेट खूपच कमी आहे. मग तिथे आपण कसं लढू शकतो, या गोष्टीचा विचार त्या त्या वेळेला नेहमी केला जातो.
हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा अनुभव चांगला आहे. मला तिथे विशेष असा काही फरक जाणवला नाही. पण त्यांचा स्तर अधिक मोठा आहे हा फरक नक्कीच आहे. जिथे आपण एक मराठी चित्रपट साधारण २५ ते ३० दिवसांत पूर्ण करतो. तिथे हिंदी चित्रपटसृष्टीत थोडीशी मुभा असते, कारण ५० ते ६० दिवसांचं त्यांचं चित्रीकरण असतं. त्यामुळे तो निर्मितीखर्च आणि अन्य गोष्टींमुळे त्यांचा भव्यपणा जाणवण्याइतपत वेगळा नक्कीच आहे. बाकी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा असा काही फरक जाणवला नाही. फक्त मराठी चित्रपटसृष्टीत बजेट व चित्रीकरणाच्या मर्यादित दिवसांच्या अनुषंगाने दिवसाचं काम थोडं जास्तं असतं. तर हिंदी चित्रपटसृष्टीत थोडंसं निवांत काम चालू शकतं.
कथेच्या अनुषंगाने ‘गालिब’ या नाटकाचं नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, वेशभूषा कशी आहे?
‘गालिब’ या नाटकाचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना प्रदीप मुळय़े यांनी केली आहे. संगीत राहुल रानडे यांनी दिलं आहे. तर वेशभूषेची धुरा मंगल केंकरे यांनी सांभाळलेली आहे. ही तिन्ही माणसं स्वत:च्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. विशेषत: प्रदीप मुळय़े आणि राहुल रानडे या दोघांनी मिळून दोनशेहून अधिक नाटकं नक्कीच केलेली आहेत. एवढा मोठा अनुभव आणि त्यांच्या तुलनेत मी ज्युनिअर असूनही ते तुमचं ऐकतात, तुम्हाला जसा हवा तसा बदल करतात आणि मी याबाबतीत स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण या दोघांबरोबर मी हे तिसरं नाटक करतो आहे आणि आतापर्यंत एकमेकांबरोबर काम करण्याचा आमचा अनुभव खूप चांगला राहिलेला आहे. ‘गालिब’ या नाटकाचं नेपथ्य, प्रकाशयोजना खूपच छान करण्यात आलेली आहे. संहिता वाचल्यानंतर दोघांनी मला अनेक पर्याय दिले की आपण असं करू शकतो, हे करता येईल. नाटकाच्या पहिल्या वाचनावेळी राहुल रानडे स्वत: हजर होते आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की जेव्हा केव्हा हे नाटक कराल तेव्हा संगीत मीच देईल आणि त्यांनी शब्द राखला याचा मला आनंद आहे.
नाटकातील तरुण कलाकारांविषयी काय सांगाल?
या सर्वच कलाकारांबरोबर काम करण्याचा माझा अनुभव छानच आहे. केवळ गौतमी आणि विराजस नव्हे तर अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी सर यांच्यासोबतही काम करताना छान वाटतं. या सर्व कलाकारांना तुम्ही जेव्हा सांगता की हे असं करा, तेव्हा ती गोष्ट दुसऱ्या तालमीला झालेली असते. याबाबतीत चौघेही भयंकर प्रामाणिक आणि कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणारे आहेत. कारण गौतमीची भूमिका थोडी कठीण असून जवळपास नाटकाच्या प्रत्येक मिनिटांत ती रंगमंचावर आहे. हे नाटक मोठं आहे. विराजसने गौतमीला खूप उत्तम सहकार्य केलेलं आहे. या नाटकात विराजस एक लेखक आहे आणि विराजसने स्वत:हून कादंबरीचं कव्हरही तयार केलं, जे आम्ही या नाटकात सेटवर वापरतो. अशा पद्धतीने सर्वच कलाकारांनी या नाटकात स्वत:ला झोकून देऊन काम केलेलं आहे.
‘गालिब’ हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांना कसं आवाहन कराल?
मराठी रंगभूमी ही दर्जेदार व सशक्त आशयासाठी ओळखली जाते. याच परंपरेला पुढे नेणारं ‘गालिब’ हे नाटक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचं आशयावर जे प्रेम आहे, ते पाहता मला असं वाटतं की ‘गालिब’ हे चांगल्या आशयावर आधारित नाटक आहे. तरुण कलाकारांनी यामध्ये उत्तम काम केलेलं आहे. या नाटकाला खूप चांगलं दृश्य मूल्य (व्हिज्युअल व्हॅल्यू) आहे. कारण नाटकाचं संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना आदी सर्वच गोष्टी आम्ही खूप चांगल्या दर्जाचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे प्रेक्षक हे नाटक पाहायला येतील, त्यांना ते नक्कीच आवडेल आणि इतरांनाही ते हे नाटक पाहण्यासाठी आग्रह करतील, अशी मला अपेक्षा आहे.