पंकज भोसले

जिम जारमुश या दिग्दर्शकाच्या चित्रपटांतील कथानकाची संथ परंपरा ज्यांना माहिती आहे, तो सहसा त्यांच्या वाटेला जात नाही. मात्र बहुतांश वेळा कसलेल्या अभिनेत्यांना आणि तारांकित संगीतकारांना घेऊन आपल्या चित्रपटाची गोष्ट विचित्र पद्धतीनेच मांडणारा हा प्रायोगिक दिग्दर्शक महत्त्वाच्या अमेरिकी चित्रकर्त्यांपैकी एक मानला जातो. अभिजात गाणी, कविता, शहरगावातील संथ आयुष्य, स्वीकारलेल्या किंवा लादलेल्या एकांतात जगणाऱ्या माणसांसमोर येणारा अखंड कंटाळा, उपजीविकेसाठी वाहन चालविणाऱ्या व्यक्तिरेखा, गुन्हेगारी विश्वातील अत्यंत हुशार आणि तल्लख माणसे आदी घटकांची पुनरावृत्ती त्याच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमध्ये पाहायला मिळू शकते. म्हणजे ‘घोस्ट डॉग : वे ऑफ सामुराई’ चित्रपटामध्ये भाडोत्री खुन्याचा व्यवसाय करणारा नायकही कवी मनाचा आणि बऱ्यापैकी ग्रंथवाचन वगैरे करणारा दाखविला आहे. तर ‘पॅटरसन’ या अलीकडच्या चित्रपटामध्ये परिवहन सेवेत असणारा बस ड्रायव्हर आपला सगळा प्रवास कवितेमध्ये जगताना रंगविला आहे. ‘स्ट्रेन्जर दॅन पॅरेडाइझ’, ‘डेड मॅन’,‘ ब्रोकन फ्लॉव्हर’, ‘मिस्ट्री ट्रेन’, ‘कॉफी अ‍ॅण्ड सिगरेट्स’,‘नाइट ऑन अर्थ ’  या त्याच्या उत्तम चित्रपटांपैकी कुठल्याही चित्रपटातील कथानक वेगात घडत नाही. अस्पष्ट कथानकांसह अत्यंत कलात्मक चित्रपटनिर्मिती करणारा दिग्दर्शक, ही त्याची ओळख. जॉनी डेपपासून बिल मरीपर्यंत हॉलीवूडमधील दादा कलावंत आणि इगी पॉपपासून ते टॉम वेट्सपर्यंत पॉपस्टार्सचा ताफा त्याच्या चित्रपटांमध्ये काम करतो. चित्रपट लोकप्रिय होवोत किंवा फ्लॉप, तो त्याची तिरकस शैली सोडताना दिसत नाही. नुकताच आलेला आणि चित्रप्रकारामुळे मुख्य धारेतला शोभत असलेला ‘डेड डोण्ट डाय’ हादेखील त्याच्या तिरपागडय़ा शैलीपेक्षा वेगळा नाही.

बिल मरी, टिल्डा स्विंटन,अ‍ॅडम ड्रायव्हर, क्लोई सॅव्हिनी, स्टीव्ह बुसेमी आदी तगडी अभिनेत्यांची फौज घेऊन त्याला मूर्ख व्यक्तिरेखांनी भरलेला एक वाईट चित्रपट बनविण्याची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याने झॉम्बी हा सध्याचा सर्वात चलती असलेला, कथानक वेगात घडविणारा चित्रप्रकार निवडला. स्टर्जिल सिम्सन या सध्याच्या  लोकप्रिय कण्ट्री गायकाच्या गाण्याचे शब्द शीर्षक म्हणून उचलले. एवढेच नाही, तर घासून गुळगुळीत झालेल्या ओळखीच्या दृश्यसंकल्पनांमधून अमेरिकेतील राजकीय- पर्यावरणीय ऱ्हासाचा, वंशभेदाचा प्रश्न मांडायला घेतला. त्याचबरोबर विविध गॅझेट्स आणि व्यसनांनी व्यापलेल्या आयुष्यावर धोपट भाष्य करण्याचा प्रयत्न केला. हे कमी म्हणून की काय, सेलेना गोमेझ या आघाडीच्या गायिकेसह इगी पॉप, टॉम वेट्स या संगीतकारांना अभिनयाच्या मैदानात पाचारण केले.

चित्रपट सुरू होतो सेंटरविल या जेमतेम साडेसातशे लोकसंख्या असलेल्या गावातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईपासून. गाव छोटे असल्याने येणारी कोणतीही तक्रार मोठी या न्यायाने क्लीफ रॉबर्टसन (बिल मरी) आणि रॉनी पीटर्सन (अ‍ॅडम ड्रायव्हर) संशयित कोंबडीचोराला पकडण्यासाठी गावाच्या वेशीवर आलेले असतात. तेथे बैराग्यासारखे राहत असलेल्या हर्मिट बॉबला (टॉम वेट्स) शरण आणणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत भर दुपारीच अंधार झाल्याबद्दल त्यांच्याकडून आश्चर्य व्यक्त होते. पोलीस स्टेशनात परतल्यानंतर पृथ्वीवर घडणाऱ्या पर्यावरणीय बदलांबाबत ओरडणाऱ्या बातम्या ते टीव्हीवर पाहतात. मात्र वातावरणातले खरे बदल रात्री घडायला लागतात. स्मशानातील थडग्यांतून मृत व्यक्ती झॉम्बी बनून शहरांतील घरांच्या दिशेने यायला लागतात. या साऱ्यांपासून गावातील व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी अर्थातच क्लीफ, रॉनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मिंडी (क्लोई सॅव्हिनी) या अनुभव नसल्याने घाबरट राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर येते.

चित्रपटाचे कथानक जारमुशने आखून दिलेल्या वेगापलीकडे जाऊ शकत नाही. अन् वल्ली शोभाव्या अशा व्यक्तिरेखांचे कथानकामधील आगमनही थांबत नाही. गावातील कॅफेमध्ये ‘मेक अमेरिका व्हाइट अगेन’ या घोषवाक्याची टोपी घातलेला फ्रँक मिलर (स्टीव्ह बुसेमी) कृष्णवंशीय व्यक्तीसोबत वंशविद्वेशी चर्चा करताना दिसतो. बडय़ा शहरातून दोन मित्रांना आपल्या उंची गाडीतून फिरायला घेऊन आलेली झोई (सेलेना गोमेझ) एका रात्रीच्या निवासासाठी नेमके समरविल शहरामधले मोटेल शोधून काढते.

झॉम्बींच्या खुनी हल्ल्यांचा आरंभ झाल्यानंतर गरिबांचे सुपरमार्केट म्हणून ख्याती असलेल्या हॅन्कच्या (डॅनी ग्लोव्हर) दुकानातील शस्त्रांना अचानक महत्त्व येते आणि लढण्यासाठी तीन पोलीस आणि गावातील निवडक सजग मंडळी सज्ज होतात. रक्त पिण्यासोबत इथले झॉम्बी हे मृत्यूपूर्व आयुष्यातील गोष्टींचीच पुनरावृत्ती करताना दिसतात. त्यामुळे गिटार वाजवणारे, टेनिस खेळणारे आणि विविध क्रियांमध्ये अडकलेले झॉम्बी दिसायला लागतात.

‘डेड डोण्ट डाय’ हा झॉम्बींशी लढाई करणारा सुटकापट नाही. तर जारमुशच्या मॅडकॅप संकल्पनेतून निघालेल्या  विविध गोष्टींचा कोलाज आहे. त्यामुळे इथल्या विनोदापासून ते काही व्यक्तिरेखांच्या राहिलेल्या अपूर्ण गोष्टी अजिबातच गंभीर घेण्याची गरज नाही. जगअंताची बखर सांगून मानवाचा ऱ्हास दाखविणाऱ्या इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांप्रमाणे याची जराही मांडणी नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या वकुबाप्रमाणे तो मनोरंजनाचा आनंद देऊ शकेल.

Story img Loader