अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि ‘सरहद’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबमधील घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर ख्वाजा सय्यद यांनी तयार केले आहे.बोधचिन्हात संत नामदेवांचे चित्र असून त्याखाली नामदेवांच्या ‘नाचू कीर्तनाचे रंगी लावू ज्ञानदीप जगी’ या अभंगातील ओळ आहे. तसेच पुस्तक, दौत आणि मोरपीस हे ग्राफिक स्वरूपात दिले आहे.
मूळचे तुळजापूर जिल्ह्यातील आरवी बुद्रुक गावचे असलेले ख्वाजा सय्यद यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून १९९२मध्ये पदवी मिळविली. लहानपणापासून भजन, कीर्तन पाहात आणि ऐकत आल्यामुळे त्यांना संतपरंपरा, वारकरी परंपरा याची माहिती होती. ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा महाउत्सव आहे. अशा महाउत्सवाच्या बोधचिन्हाचे काम मला मिळाले आणि संमेलनासाठी मी तयार केलेले बोधचिन्ह निवडण्यात आले, ही माझ्यासाठी आनंदाची, अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो,’’ अशा शब्दांत ख्वाजा सय्यद यांनी आपल्या भावना ‘वृत्तान्त’कडे व्यक्त केल्या.
बोधचिन्ह तयार करण्यापूर्वी साहित्य संमेलनाच्या यापूर्वीच्या बोधचिन्हांचा अभ्यास केला. मग माझ्या मनातील विचारांनुसार मी वेगवेगळी पन्नासहून अधिक बोधचिन्हे तयार केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, संमेलनाचे आयोजक संजय नहार आणि अन्य संबंधिताना ती दाखविली. त्यांनी सुचविलेल्या बदलानुसार अखेर हे अंतिम बोधचिन्ह आपण तयार केल्याचे ख्वाजा म्हणाले.
ख्वाजा हे गेल्या काही वर्षांपासून मुंबईत स्थायिक असून सुरुवातीला त्यांनी गुलशनकुमार यांच्या ‘टी सीरिज’ कंपनीच्या ध्वनीफितींसाठी कव्हर डिझायनर म्हणून काम केले. एचएमव्ही सारेगामाच्या मराठी ध्वनीफिती, सीडीसाठीही ख्वाजा यांनीच आकर्षक वेष्टणे तयार केली आहेत.
घुमानकडे पर्यटकांचा ओघ वळविण्यासाठी प्रयत्न
मराठी भाषा आणि साहित्याचा महाउत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी पंजाबमधील घुमान येथे होणार आहे. त्यामुळे घुमानला पर्यटन स्थळाच्या नकाशावर आणण्यासाठी संमेलन आयोजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या निमित्ताने संत नामदेव यांचे वास्तव्य असलेल्या या गावी जास्तीत जास्त मराठी पर्यटकांनी भेट द्यावी, असा विचार पुढे आला असून त्यासाठी पावले टाकली जात आहेत.
‘सरहद’ संस्था, घुमान ग्रामपंचायत आणि बाबा नामदेव दरबार समिती संमेलनाचे प्रमुख आयोजक आहेत. पंजाबमध्ये संत नामदेव हे ‘बाबा नामदेव’ या नावाने ओळखले जातात. घुमान हे गाव या संमेलनाच्या निमित्ताने पर्यटकांसाठी विशेषत: महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी ‘तीर्थस्थान’व्हावे, असेही प्रयत्न ‘सरहद’ संस्था करत आहे.
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर आदी काही प्रमुख स्थळांना अनेक पर्यटक भेट देतात. विविध पर्यटन संस्थांच्या पंजाब/अमृतसर सहल नियोजनात या दोन स्थळांचा समावेश असतो. महाराष्ट्रातूनही या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या पर्यटकांना घुमानकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन कंपन्यांशी बोलणी करून त्यांच्या सहलीत घुमानचा समावेश करावा, अशी विनंती त्यांना केली जाणार असल्याचे ‘सरहद्दद’ संस्थेचे संजय नहार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
घुमान येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाणार असल्याचे जाहीर झाल्यापासून घुमानची चर्चा साहित्यप्रेमी आणि मराठी मंडळींमध्ये सुरू झाली आहे. पंजाबला भेट देणाऱ्यांपैकी काही मराठी पर्यटकांनी आवर्जून घुमानला भेट द्यायला सुरुवात केली आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी येत्या काही दिवसांत त्यात नक्कीच वाढ होईल, असा विश्वासही नहार यांनी व्यक्त केला.