वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘घुमान प्रश्नमंजुषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. आजवर झालेल्या साहित्य संमेलनासंदर्भात पाच प्रश्न विचारण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही आणि कोणतेही शुल्क नाही.
प्रश्नांची उत्तरे पाठविण्याची शेवटची तारीख १२ मार्च अशी असून १५ मार्च रोजी सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील कार्यालयात टपालाद्वारे किंवा प्रत्यक्ष, ९२२५५९२२५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ghumansahityasammelan@gmail.com या मेल आयडीवरही प्रश्नांची उत्तरे पाठविता येणार आहेत.पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आणि कोणत्या वर्षी झाले, पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, ‘बालकवी’ या नावाने कोणाला ओळखले जाते आणि ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कोण आहेत असे पाच प्रश्न या स्पर्धेच्या निमित्ताने विचारण्यात आले आहेत. स्पर्धेतील पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या पाच विजेत्यांना घुमान साहित्य संमेलनासाठी मोफत नेण्यात येणार आहे तर अन्य शंभर जणांना दोन हजार रुपये किमतीचा पुस्तके भेट म्हणून देण्यात येणार आहेत. पाच विजेत्यांची व अन्य शंभर जणांची निवड सोडत पद्धतीने केली जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसडला, संमेलन आयोजित करणाऱ्या ‘सरहद्द’ संस्थेचे संजय नहार आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संयोजक सुधीर शिंदे यांनी दिली.

Story img Loader