कुठल्याही क्षेत्रात एक पिढी जेव्हा मावळतीच्या टोकावर असते तेव्हा उगवत्या पिढीचा हात धरून त्यांना दिशा दाखवण्याची जबाबदारी ही त्या जाणत्या पिढीचीच असते. हिंदी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. बॉलीवूडची ‘खाना’वळ आणि इतर आघाडीचे नाते पन्नाशीपर्यंत पोहोचलेले असल्याने आता त्यांचा ‘हीरो’चा वारसा हा आपोआप नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत येऊन पोहोचला आहे. मात्र या इंडस्ट्रीत आपले पाऊल टिकवायचे असेल तर या जुन्या-जाणत्या ‘स्टार’ कलाकारांची कौतुकाची थाप पाठीवर मिळाली पाहिजे, असे या नव्या कलाकारांना वाटते आहे. या वर्षभरात स्टार कलाकारांची मुले किंवा हिंदीत येऊ पाहणारे नवे कलाकार अशी मोठीच्या मोठी लाट रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. यांच्यापैकी प्रत्येकाला कोणा ना कोणा मोठय़ा कलाकाराची साथ मिळाली आहे आणि ती फार महत्त्वाची आहे, असे त्यांना वाटतेय. या नव्या कलाकारांशी बोलून बॉलीवूडमध्ये झालेल्या या जुन्या-नव्या संगमाचा वेध..
गेल्या काही वर्षांत अर्जुन कपूर, सोनम कपूर, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अलिया भट्ट या नवीन कलाकारांच्या फळीने बॉलीवूडवर पकड घेतली असली तरी अजून त्यांच्यापेक्षाही नव्या कलाकारांची एक फौज बॉलीवूडच्या उंबरठय़ावर प्रवेशासाठी धडपडते आहे. मात्र, त्यांना पुढे आणण्यासाठी सलमान खान, फरहान अख्तर, अक्षयकुमार आणि अगदी आमिर खानसारख्या मोठमोठय़ा कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. नव्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वात मोठा आधार मिळतो तो ‘भाई’चा. ‘बीइंग ह्य़ुमन’ सलमान खानमुळे याआधीच अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांना बॉलीवूडची वाट मिळाली आहे. अगदी दोघांनाही वजन कमी करायला लावून चित्रपटापर्यंत आणण्याचा खटाटोप सलमानने केला आणि तो फळालाही आला. पण सतत नव्या चेहऱ्यांना टिपून त्यांना बॉलीवूडमध्ये आणणे हा जणू त्याचा सहजस्वभावच झाला आहे. आणि केवळ त्याच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच अनेक कलाकार आपण बॉलीवूडमध्ये येण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे सांगतात.
जुन्या पिढीतील कलाकारांनी नव्या कलाकारांना चित्रपटातून संधी देण्याचा खटाटोप का चालवला असेल? या प्रश्नावर फरहान अख्तरचे उत्तर चांगले आहे. फरहानच्या मते कुठल्याही क्षेत्रात प्रत्येक पिढीने नव्या पिढीला घडवलेच पाहिजे. तरच त्या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होऊ शकते. माझा पिढी घडवण्यावर विश्वास आहे, असे सांगणाऱ्या फरहानने आपल्या एक्सेल एंटरटेन्मेट या बॅनरखाली अनेक नव्या कलाकारांना संधी देऊ केली आहे. एवढेच नव्हे तर पुलकित सम्राट, मनजोत सिंग, अली फ जल, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा आणि विशाखा सिंग अशा अगदी नव्या कलाकारांना त्याने ‘फुकरे’ चित्रपटात संधी दिलीच. पण, तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्याबरोबर सतत काम करीत राहणार, असं आश्वासनही त्याने दिले आहे. अक्षयकुमारची निर्मिती असलेल्या ‘फुगले’ चित्रपटातूनही नव्या कलाकारांची फौज दाखल होते आहे यात मोहित मारवा, विजेंदर सिंग, कियरा अडवाणी यांचा समावेश आहे, तर सलमाननेही बिलाल अमरोही आणि पुलकितच्या ‘ओ तेरी’ चित्रपटामागे आपली सारी शक्ती उभी केली होती. आपल्या मित्रासाठी का होईना, आमिर खाननेही स्वत: जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर याच्या पदार्पणातील ‘हिरोपंती’ या चित्रपटासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याची माध्यमांना ओळख करून दिली. नव्यांना पुढे आणण्यासाठी कलाकारच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शकांनीही पुढाकार घेतला असून राकेश ओमप्रकाश मेहरा हे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनला ‘मिर्झा साहिब’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आणणार आहेत. या बिनीच्या शिलेदारांनी दिलेला पाठिंबा आणि मदत आज बॉलीवूडमध्ये फार उपयोगी पडते आहे, असा या नव्या कलाकारांचा दावा आहे.
* फरहानचा पाठिंबा आणि त्याने दिलेले आश्वासन खूप मोलाचे आहे -अली फजल
‘थ्री इडियट्स’मध्ये मी केलेली जोची भूमिका लोकांना लक्षात राहिली होती. त्यानंतर एक चित्रपटही मी केला, पण तो फारसा चालला नाही. माझ्या नावावर अपयश असतानाही फरहानने ‘फुकरे’मध्ये मला चांगली भूमिका दिली. एक अभिनेता म्हणून आमची घडण होतेय यावर निर्माता म्हणून त्याचे आणि रितेश सिधवानी यांचे बारीक लक्ष असायचे. आमच्याबरोबर सतत चर्चा, प्रत्येक कार्यक्रमाला असलेली त्यांची हजेरी यामुळे ‘फुकरे’ यशस्वी होण्यास मदत झालीच, पण ‘फुकरे’ प्रदर्शित झाला, आता सगळे संपले, असे वाटत असतानाच त्याने यापुढेही तुम्ही एक्सेलबरोबर काम करणार आहात. तुम्हाला मी मध्येच सोडून देणार नाही, असे सांगितले तेव्हा फार मोठे बळ आले होते. कोणतीही ओळख नसताना केवळ तुमच्या अभिनयकौशल्यावर विश्वास ठेवून इतका मोठा कलाकार तुमच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी उत्साह येतो.
* ‘स्टार’ कलाकारांमुळे बॉलीवूडची बिकट वाट सोपी होते -पुलकित सम्राट
मी फरहान आणि सलमान दोघांबरोबर काम केले आहे. त्या दोघांबरोबरही काम करताना तितकाच चांगला अनुभव आला. फरहानच्या एक्सेल बॅनरने तर आम्हाला पूर्णपणे अभिनेता म्हणून घडवले आहे. त्याने आम्हाला नवीन कलाकार असूनही स्वातंत्र्य दिले होते. सलमानभाईची तर गोष्टच वेगळी आहे. त्याने तर मला कथा ऐकवण्याचे स्वातंत्र्य दिले, ती आवडली म्हणून निर्मिती करायचीही ठरवली आणि त्यानंतर तो ‘ओ तेरी’च्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींनाही आवर्जून हजर राहिला. अशा स्टार कलाकारांमुळे इथली वाट सोपी होते. तुमचा चित्रपट एकाच वेळी प्रेक्षकांपर्यंत आणि चित्रपटसृष्टीतील जाणत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
* त्यांच्याचमुळे तर पटकथा लेखक ते अभिनेता एवढा पल्ला एका उडीतच गाठता आला -बिलाल अमरोही
कमल अमरोहींचा नातू असलो तरी मी हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन नाही. माझे वडील ताजदार अमरोही यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. पण मी माझी सुरुवात पटकथा लेखनापासून केली होती. मला त्यात रस होता. सलमान खानच्या चित्रपटांसाठी पटकथेवरच काम करीत असताना माझी अभिनेता म्हणून ‘ओ तेरी’साठी उचलबांगडी करण्यात आली. म्हणजे, तुला अभिनेता म्हणून चित्रपट मिळवून देण्याचे आश्वासन मला सलमानकडून मिळाले होते, पण अवघ्या काही दिवसांत मी अभिनेता म्हणून चमकेन असे वाटले नव्हते.
* अक्षय असला तरी ऑडिशन्सपासून कामापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता -मोहित मारवा
‘फुगले’ या अक्षयकुमार आणि अश्विनी यार्दीच्या ग्रेझिंग गोट्स प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या चित्रपटातून बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज असलेला मोहित मारवा हा अर्जुन आणि सोनम कपूर यांचा चुलत भाऊ आहे. अक्षयकुमारमुळे ‘फुगले’सारखा एक मोठा चित्रपट मिळाला आहे आणि बॉलीवूड प्रवेशासाठी हे मोठे व्यासपीठ आहे. त्यासाठी त्यांनी आमच्याकडून मेहनतही करवून घेतली. ऑडिशन्सपासून ते प्रत्यक्ष काम सुरू करण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी सतत आमचा धीर वाढवला. हे पुढच्या यशासाठी टॉनिक ठरणार आहे.
*चांगली निर्मिती संस्था पाठीशी असल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही -विजेंदर सिंग
ऑलिम्पिक विजेता विजेंदर सिंग यालाही अक्षयने ‘फुगले’मधून अभिनेता होण्याची संधी दिली आहे. आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये रुळलेल्या विजेंदरने चित्रपटाच्या यशात पटकथा आणि दिग्दर्शन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असल्या तरी चांगली निर्मिती संस्था आणि त्यांचा विश्वास याशिवाय तुम्हाला काम करताना आत्मविश्वास मिळत नाही. अक्षयच्या पाठिंब्याने आत्मविश्वास वाढवला आहे.
आहे गॉडफादर म्हणून..
कुठल्याही क्षेत्रात एक पिढी जेव्हा मावळतीच्या टोकावर असते तेव्हा उगवत्या पिढीचा हात धरून त्यांना दिशा दाखवण्याची जबाबदारी ही त्या जाणत्या पिढीचीच असते.
First published on: 13-04-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godfathers in bollywood