आजचं सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वास्तव इतकं अराजकतावादी झालेलं आहे की त्यावर काही कलात्मक प्रतिक्रिया देऊ जाणं, त्यावर काहीएक भाष्य करणं अवघडच नाही, तर जवळजवळ अशक्यच झालेलं आहे. त्याची कारणं बरीच आहेत. मूल्यांचा अंत, तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांमुळे समोर उभ्या ठाकलेल्या समस्या, एकीकडे जग भौतिकदृष्ट्या जवळ येत असताना संकुचित अस्मिता, स्वार्थांधता, आपमतलबीपणा, ‘मी’शिवाय काहीच महत्त्वाचं नाही इथवर माणसाची गेलेली मजल, जगभर उजव्या शक्तींची झालेली अपरिमित वाढ… पर्यायानं उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आदी मूल्यांची झालेली/होत असलेली गळचेपी, वाढता सार्वत्रिक दहशतवाद, उपटसुंभ नेत्यांकडे गेलेलं जगाचं नेतृत्व अशा अनेकानेक कारणांनी सध्या जगभरातली माणसं संभ्रमित झालेली आहेत. काय चूक, काय बरोबर याची निवड करणंही त्यांना कठीण होत आहे. त्यातूनच हळूहळू ती निष्क्रिय बनत चालली आहेत. ‘मला काय त्याचे?’ असा त्यांचा दृष्टिकोन बनला आहे. त्यामुळे सत्य, मानवता, सहिष्णुता, उदारमतवाद ही मूल्यं जवळजवळ लोप पावत चालली आहेत. एकूणच आजूबाजूला अराजकाचं राज्य निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. बरं, याबद्दल कुणी आवाज उठवलाच, तर त्याला भयंकर ट्रोल करून जगणं मुश्कील करून सोडलं जातं. त्यासाठी ‘ट्रोल’धाडी पाळल्या गेल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी सामाजिक जागलेपणाची भूमिका घेणारेही कोणत्याच बाबतीत व्यक्त व्हायला कचरू लागले आहेत. खोटा राष्ट्रवाद त्यांना नेस्तनाबूत करायला सज्ज आहेच. एकुणात काय, ह्यमाणूसह्ण म्हणून जगणं दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललं आहे. आणि याबद्दल व्यक्त व्हायचं ठरवलंच कुणी… तर त्याला स्वतंत्र बाण्याची माध्यमं तरी उपलब्ध आहेत का व्यक्त व्हायला? तिथेही निराशाच पदरी पडते. अशा मिट्ट काळोख्या रात्री कुणी व्यक्त व्हायचं म्हटलंच तर त्याला एकच माध्यम उपलब्ध आहे… ते म्हणजे असंगतता! आविष्कार निर्मित, योगेश्वर बेंद्रे लिखित आणि संदेश दुगजे दिग्दर्शित ‘गोळकोंडा डायमंड्स’ हे असं आजच्या परिस्थितीवर भाष्य करू इच्छिणारं असंगत नाटक आहे. नुकतंच ते पाहण्याचा योग आला. गेल्या वर्षी एनसीपीएच्या ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेतील हे विजेते नाटक. मात्र, त्यावेळी त्यात असलेली धार आता प्रयोगात बोथट झालेली जाणवते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा