Ranya Rao Gold Smuggling : सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी अटक झाली. या कारावाईनंतर तब्बल १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली होती. रान्या राव ही अनेकदा दुबईला ये-जा करत असायची आणि यातूनच पोलिसांना संशय आला आणि डीआरआयने तिच्यावर कारवाई केली.
सोन्याच्या तस्करी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. रान्या रावने हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. रान्या रावच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी डीआरआयची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी रान्या रावने सोने खरेदीसाठी हवाला पैशांचा वापर केल्याचं कबूल केलं असल्याचं न्यायालयात सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
रान्या रावच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, तिला जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय बंगळुरू सत्र न्यायालयाने २७ मार्चपर्यंत राखून ठेवला आहे. रान्या रावचा जामीन अर्ज आतापर्यंत दोनदा फेटाळण्यात आला आहे. आता सुनावणीतील युक्तिवाद पूर्ण झाला असून जामिनासंदर्भातील निर्णय न्यायालय २७ मार्च रोजी देणार आहे. त्यामुळे रान्या रावला दिलासा मिळणार की नाही? हे २७ मार्चला स्पष्ट होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड अभिनेत्री रान्या रावने १५ दिवसांत चार वेळा दुबई प्रवास केला आणि ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. रान्या राववर पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यानंतर ३ मार्च रोजी रान्या रावला बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. यावेळी तिची झडती घेण्यात आली तेव्हा ती सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली. तिच्याकडून तब्बल १२ कोटीपेक्षा जास्त रुपयांचं सोनं आढळून आलं होतं. यानंतर तिच्या घराचीही झडती घेण्यात आली, तेव्हा तिच्या घरीही देखील २ कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आढळून आले होते. दरम्यान, या प्रकरणात तिला अटक करण्यात आली असून ती अद्याप तुरुंगात आहे.
रान्या राव कोण आहे?
रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. हिंदुस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील के रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कर्नाटक राज्य पोलीस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगळुरूमधून पूर्ण केलं. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं, २०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली.