कन्नड अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला ४ मार्च रोजी बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी तिची झडती घेण्यात आली असता तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं. या प्रकरणी तिचा पती जतिन हुक्केरीचीदेखील (Jatin Hukkeri) चौकशी केली जात आहे. अशातच त्याने न्यायालयात अपील केले आहे आणि अटकेपासून सूट मागितली आहे. शिवाय न्यायालयात याचिका दाखल करताना त्याने एक नवीन खुलासा केला आहे.
रान्या रावबरोबरचे त्याचे नाते नाममात्र आहे, कारण लग्नाच्या पुढच्याच महिन्यापासून रान्या त्याच्यापासून वेगळी राहत असल्याचे त्याने म्हटलं आहे. वकील प्रभुलिंग नवदगी यांनी हुक्केरीच्या अटकेपासून सूट मागितली आहे. कारण त्याने नोव्हेंबरमध्ये रान्याशी लग्न केले होते. पण डिसेंबरपासून काही समस्यांमुळे ते अनधिकृतपणे वेगळे झाले आहेत. त्यामुळे हुक्केरीच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या रावला ४ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आणि २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. तेव्हा तिला अटक करण्यात आली आहे असून ती आता कोठडीत आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि इतर एजन्सींनी केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, रान्याने या वर्षी किमान २७ वेळा दुबईला प्रवास केला आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून प्रत्येक ट्रिपमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. पण अभिनेत्रीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
याबद्दल रान्याने म्हटले आहे की, दुबईहून परतल्यावर तिच्यावर १४ किलोपेक्षा जास्त सोन्याची तस्करी केल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात तिने आरोप केला आहे की, अधिकाऱ्यांनी तिला कानाखाली मारली आणि रिकाम्या कागदावर सह्या करायला लावल्या. अशातच तिच्या पतीने केलेल्या दाव्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक वळण आलं आहे.