|| नीलेश अडसूळ
हजारो वर्षांपूर्वीची परंपरा असलेली गोंधळ गीते त्यांच्या ठेकेबाज शैलीमुळे आजही आपल्याला भावतात. ही परंपरागत गीते गोंधळी, भराडी, जोगती, भोपी, शाहीर या मंडळींनी आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यात काळानुसार बदलही घडत गेले. आज आपण परंपरेपासून दूर जातो आहोत असे चित्र असले तरी हा वारसा कुठेही थांबला नाही, उलट प्रवाही होत राहिला आहे. विशेष म्हणजे आजचे नवोदित कलाकार पारंपरिक बाजाला धक्का न लावला नवी गोंधळ गीते रचत आहेत, ती संगीतबद्ध करत आहेत आणि समाजमाध्यमांच्या आधारे त्यांना लोकप्रियताही मिळते आहे. म्हणूनच नवरात्रीनिमित्ताने या नव्या गोंधळींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न…
गोंधळ गीतांचे स्फुरण काही औरच असते. म्हणजे संबळ कडाडू लागला की थेट देवीचे मूर्त रूप डोळ्यांपुढे उभे राहते. हाच या गीताचा आत्मा म्हणावा लागेल. ‘अंबा आली पाहुणी ग’, ‘तुळजापुराच्या घाटात’, ‘आली आली गोंधळाला’ अशा हजारो गीतांचा संपन्न वारसा आपल्याकडे आहे. आणि यात भर घालण्याचे काम नव्या पिढीकडून सातत्याने केले जाते आहे.
आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक रिअॅटिली शोमध्ये झळकलेल्या आणि महाराष्ट्रभर गाजलेल्या शाहीर रामानंद उगले या तरुणाने अनेक पारंपरिक आणि नवी गीते नव्याने बाजारात आणली आहेत. कोणतीही परंपरा जपण्यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे रामानंद सांगतो. रामानंदला कुटुंबाकडून वारसा लाभला असून जवळपास सात पिढ्यांची गोंधळ परंपरा त्यांच्या घराला लाभली आहे. याच परंपरेत नव्याने प्राण फुं कून तिला जिवंत करण्याचा त्याचा मानस आहे. ‘गेल्या दशकभरात किंवा आताही काही गीतकार, संगीतकारांनी गोंधळ गीतांचा दर्जा अत्यंत खाली आणून ठेवला आहे. देवी म्हणजे फक्त हळद, कुंकू, नारळ, लिंबू, घुमणे, अंगात येणे इतकेच समीकरण आहे का, मग वारंवार त्याभोवती गाणी का फिरतात?, असा प्रश्न पडतो. मुळात ज्या गीतप्रकारावर आपण काम करतो आहोत त्याचा इतिहास जाणून घ्यायला हवा. जो हल्ली कुणालाच माहिती नाही. ‘दिसली सुंदरा खेळता फुगडी, तिनं ज्ञान शृंगार केला… तरी उघडी… ब्रह्मा विष्णु महेश तिन्ही… तिने बनविले गोंडे, घातले वेणी’ अशा प्रतिभावान रचना आपल्या पूर्वजांनी करून ठेवल्या आहेत. तिचे माहात्म्य वर्णन करण्यासाठी तिची रूपे, तिचा शृंगार, तिचा पराक्रम जाणून घ्यायला हवा. लोकमान्य टिळकांनीही गोंधळ रचला होता. म्हणून आता जर आपल्याला लोक ओळखू लागलेत तर त्यांना महाराष्ट्राची खरी परंपरा, कवित्व, प्रतिभा दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण समाजमाध्यमांवर काही लोक गोंधळ म्हणून चुकीची परंपरा दाखवतात आणि नवीन प्रेक्षकांना तोच गोंधळ खरा वाटून जातो. त्यामुळे जुन्या रचना, चाली, ठेके यांचा अभ्यास करून ते लोकांपुढे आणायचे आहे,’ असे रामानंद सांगतो. लवकरच त्याच्या रामानंद उगले या यूट्यूब वाहिनीवर ही गीते पाहायला मिळतील.
कोल्हापूरचा ऋषिकेश देशमाने याच पारंपरिक वाद्यांवर अभ्यास करतो आहे. संबळ, चौंडके ही त्याची आवडती वाद्ये असून अनेक गोंधळ गीतांमध्ये, वाहिन्यांवर होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात तो वादक म्हणून सहभागी झाला आहे. याशिवाय संगीत संयोजन आणि संगीत दिग्दर्शन या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. ‘आई धावत ये सत्वरी’ हे त्याचे गोंधळ गीत गेल्या नवरात्रीत आले तर यंदाच्या नवरात्रीत ‘दुर्गास्तुती’चे संगीत संयोजन त्याने केले आहे. शब्द आणि वाद्य यांचा मेळ साधून श्रवणीय काही घडवण्याची प्रक्रिया म्हणजे गीत असे तो मानतो. गोंधळ हा अनेक प्रकारचा आहे, त्यातली वाद्ये अनेक पद्धतीची आहेत, ना ना रूपे, ना ना महात्मे यामुळे प्रत्येक गीत हे वेगळे असते, अशी माहिती तो देतो. ‘गोंधळ ही अतिप्राचीन कला आहे. गोंधळात वाजवला जाणारा संबळ लेण्यांवरही कोरला आहे. काही अभ्यासकांच्या मते तबल्याचे आद्य वाद्य संबळ असू शकते. संबळ महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही वेगवेगळ्या स्वरूपांत आढळतो. त्यामुळे जेव्हा असे परंपरागत वाद्य आपल्या हाती येते तेव्हा त्याची पाश्र्वाभूमी, त्याचे ठेके, त्यातून येणारा ध्वनी याची जाण असणे गरजेचे आहे. हल्ली उडत्या चालींची इतकी हवा आहे की गोंधळात ही ढोल ताशे लावल्याचे आपल्याला दिसतात. पण गोंधळी ठेका म्हणजे काय, त्यातले पारंपरिक प्रकार कोणते हे माहीत असयला हवे. मुळात परंपरेविषयी प्रेम असायला हवे तरच आपण आपल्या पिढीला सकस आणि निर्भेळ काही देऊ शकतो,’ असे ऋषिकेश याने सांगितले.
गायक, वादक, संगीतकार यांच्या बाजूने अनेक प्रयत्न होत असले तरी लेखनाच्या बाजूने काहीशी कामतरता जाणवत असल्याचे काही नवोदित कलाकारांशी बोलल्यानंतर जाणवले. मुळात जे गावकुसात पारंपरिकत्व दडलेले आहे तिथे महानगरी पिढी पोहोचू शकत नाही. आणि जे महानगरात रूढ झालेले असते असे अर्धवट काही ऐकून, शिकून त्याचाच पाठपुरावा केला जातो. आज संगीतात नवी पिढी अनेक प्रयोग करत असली तरी अभ्यासासाठी त्यांनी घराची आणि गूगलची वेस ओलांडून मूळ कलाप्रकाराचा ठाव घेण्याची गरज आहे, असे वाटते.
याविषयी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि लोककलावंत गणेश चंदनशिवे यांनीही आपले विचार मांडले आहेत. चंदनशिवे केवळ अभ्यासक नसून ते स्वत: कलाकार आहेत. त्यामुळे इतिहास आणि सादरीकरण याचा उत्तम मेळ त्यांनी साधला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांपर्यंतही ते ही विद्या निष्ठेने पोहोचवत आहेत. त्यांच्या मते, ‘परंपरा पुढे घेऊन जाताना त्याचा प्राकृतिक पिंड आणि पूर्वपीठिका याला कुठेही धक्का लावता कामा नये. गोंधळ हा प्रकार पोहोचवताना त्यामागची श्रद्धास्थाने आणि सौंदर्यस्थळेही विचारात घ्यायला हवी. आपली परंपरा आपण लोकांपर्यंत बेगडी पद्धतीने पोहोचवली तर त्याची मूल्ये ढासळतील आणि दुसऱ्या पिढीपर्यंत भलतेच काही पोहोचेल. आताच्या मुलांना समाजमाध्यमांचे व्यासपीठ मुक्त असले तरी त्यांनी लाइक आणि शेअरच्या प्रवाहात वाहून जाता कामा नये. उलट त्या माध्यमाचा सुयोग्य वापर करून अचूक गोष्टी मांडता यायला हव्या. आज ऐकून उद्या विसर पडेल अशी गीते तयार करायची की अजरामर काही घडवायचे या दिशेने मुलांनी जायला हवे. त्यासाठी परंपरेचे अध्ययन, अवलोकन आणि आपल्या प्रतिभेचे योगदान याचे समीकरण करावे लागेल,’ असा सल्ला त्यांनी नव्या पिढीला दिला आहे.