अमोल पालेकर यांच्यासारख्या दिग्दर्शकाने बासू चटर्जी आणि हृषीकेश मुखर्जी यांना समर्पित केलेल्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण चित्रपट विनोदी करण्याच्या नादात कथा आणि पटकथा यांची भलतीच गडबड उडाल्याने अंती प्रेक्षकाला निराशेलाच तोंड द्यावं लागतं..
एक हवा न भरलेला चोळामोळा झालेला फुगा एका कल्पक दिग्दर्शकाच्या हातात मिळतो. दिग्दर्शकाला त्याचा रंग आकर्षक वाटतो. मग दिग्दर्शक त्या फुग्यात हवा भरण्याचा प्रयत्न करतो. यात पटकथा व संवाद लेखकालाही मदतीला घेतो. फुगा थोडा फुगतो. पण दिग्दर्शकाचं समाधान होत नाही. मग चित्रपटसृष्टीतली तगडी स्टारकास्ट गोळा केली जाते. फुगा त्याच्या मानाने खूपच जास्त फुगतो. तरीही दिग्दर्शकांचं समाधान होत नाही. मग त्या फुग्यात प्रसिद्धीची जास्तीची हवा भरली जाते. फुगा आणखीनच फुगतो. शेवटी जेमतेम फुटभर फुगण्याची क्षमता असलेल्या त्या फुग्याला महाप्रचंड आकार देऊन बाहेर सोडलं जातं. पण एवढी हवा सोसण्याची कुवतच नसलेला तो फुगा फाट्कन फुटतो आणि आपल्या पूर्ववत स्थितीपेक्षाही खराब स्थितीत येतो. अमोल पालेकर आणि संध्या गोखले दिग्दर्शित ‘वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या’ या चित्रपटाची अवस्था त्या फुग्यासारखी झाली आहे.
एकाच परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील काही वयोवृद्ध मंडळी रोज सकाळी जवळच्या मैदानात नेमाने फिरायला येत असतात. काही दिवसांपासून या मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करत असलेल्या या मंडळींच्या मुलांचा त्रास त्यांनाच व्हायला लागतो. छोटय़ामोठय़ा कुरबुरींचं पर्यवसान मोठय़ा भांडणात होतं आणि मग हे दोन्ही गट एकमेकांना क्रिकेटच्या मैदानात आव्हान देतात. नव्या व जुन्या पिढीतला संघर्ष ही अमोल पालेकर यांच्या डोक्यातील संकल्पना नक्कीच चांगली आहे. त्यासाठी क्रिकेटची मॅच या माध्यमाची निवडही चांगली आहे. त्यामुळे चित्रपट हलकाफुलका होण्यास मदत झाली आहे.
पण चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिताना खूप गडबड उडाली आहे. अनेक प्रसंग काहीच गरज नसताना घुसडले आहेत. प्रेक्षकांना त्या प्रसंगांशी काहीच देणंघेणं असल्यासारखं वाटत नाही. अनेक पात्रांचं प्रयोजनही लक्षात आलं नाही. उदा. संदीप पाठक याने साकारलेल्या सेल्स एजण्टची संपूर्ण चित्रपटात काहीच गरज नव्हती. तीच गोष्ट समीर चौघुलेच्या भूमिकेची. त्याचप्रमाणे मारणे (सतीश पुळेकर) यांच्या बायकोचे निधन झाल्याचे दाखवण्यामागे केवळ मारणे हे आडनाव असल्याने तिला मारण्यात आले की काय, असा प्रश्न पडतो. हे असले अनेक अनावश्यक प्रसंग काढले असते, तर चित्रपटाची लांबी सध्याच्या लांबीपेक्षा केवळ अर्धीच राहिली असती. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे चित्रपटात घेतलेल्या कुटुंबांपैकी एकाही कुटुंबातील मुलं आपल्या वडिलांना अशा प्रकारे मैदानात आव्हान देतील, हेच पटत नाही. तसंच तरुण मुलं आपल्या वय झालेल्या वडिलांशी अशा प्रकारे वागतील का, याचा विचारही व्हायला हवा होता.
चित्रपटाला एक सोडून दोन दिग्दर्शक लाभले आहेत, हे चित्रपटाचं दुर्दैव म्हणावं की सुदैव, याचा विचार करायला हवा. हे कथानक म्हणजे या दोन्ही दिग्दर्शकांचं बाळ असल्याने त्यांनी आपल्या परीने त्या बाळावर चांगले संस्कार करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांना आपल्या पटकथेतले दोष ती पटकथा प्रत्यक्षात पडद्यावर उतरताना दिसलेले नाहीत. किंवा मग ‘आपला तो बाब्या..’ या न्यायाने त्यांचं दुर्लक्ष झालं असावं. चित्रपटात केवळ मजा करायची, या विचाराने पटकथेतील सशक्त बाजूवर अन्याय झाला आहे. ‘ध्यासपर्व’सारखा आशयघन चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या अमोल पालेकर यांचाच हा चित्रपट आहे, हे पटत नाही. चित्रपटातील काही जागा तर खुद्द दिग्दर्शक द्वयीलाच कळल्या आहेत की, नाही याबाबत शंका आहे. आतिशा नाईक आणि समीर चौघुले एकमेकांना कधी, कसे आणि का भेटतात, उपेंद्र लिमयेच्या प्रेमाचा ट्रॅक दाखवण्याची काय गरज, रमेश भाटकर आणि त्याच्या बायकोतील तणावाचा ताण प्रेक्षकांनी का घ्यावा, असे अनेक मुद्दे अनुत्तरित राहतात. अमोल गोळेला या चित्रपटात छायांकनासाठी फार काही वावच मिळाला नसल्याची शक्यता आहे. कारण छायांकनात त्याचा ठसा कुठेच दिसत नाही.
वेशभूषा आणि रंगभूषा याबाबत मात्र चित्रपट चांगला झाला आहे. त्याप्रमाणे नैसर्गिक प्रकाशात चित्रीकरण केल्याचा फायदा म्हणून चित्रपटाचा लूक अत्यंत फ्रेश आहे. कलाकारांची एवढी दमदार फळी असल्यावर अभिनयाच्या प्रांतात कॅच सुटण्याची शक्यताच नव्हती. मराठी मनोरंजनसृष्टीतले एवढे गुणी कलाकार एकाच चित्रपटात एकत्र येऊनही प्रेक्षकांच्या हाती काहीच लागत नाही, हे दुर्दैव! पण तरीही दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सतीश आळेकर, मकरंद अनासपुरे, अजित केळकर, सतीश पुळेकर, रमेश भाटकर, मनोज जोशी, श्रीराम पेंडसे, सुनील गोडबोले, विजय केंकरे, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ या बुजूर्ग अभिनेत्यांनी आणि उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, गौतम जोगळेकर, पुष्कर श्रोत्री, अतिशा नाईक, सुहासिनी परांजपे या तरुणांनी चित्रपटात मिळालेली भूमिका चोख बजावली आहे. बासू चटर्जी आणि हृषीकेश मुखर्जी यांना समर्पित करावं आणि पुलं, राजा गोसावी, मास्टर विनायक, दामुअण्णा मालवणकर यांच्या चित्रपटाची आठवण यावी, असं या चित्रपटात पालेकर यांना काय दिसलं, ते फक्त तेच जाणे!
अनान निर्मिती
‘वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या’,
संकल्पना – अमोल पालेकर, पटकथा, संवाद, कला, वेशभूषा – संध्या गोखले, दिग्दर्शन – संध्या गोखले, अमोल पालेकर, छायांकन – अमोल गोळे, कलाकार – दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सतीश आळेकर, मकरंद अनासपुरे, अजित केळकर, सतीश पुळेकर, रमेश भाटकर, मनोज जोशी, श्रीराम पेंडसे, सुनील गोडबोले, विजय केंकरे, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, गौतम जोगळेकर, पुष्कर श्रोत्री, अतिशा नाईक, सुहासिनी परांजपे, संदीप पाठक, समीर चौघुले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा