सुपरस्टार शाहरुख खानला तर सर्वचजण ओळखतात. त्याचे चित्रपट बॉलीवूडमध्ये १०० कोटी क्लबमध्ये असतात, त्याने आयपीएलचा संघ विकत घेतलेला आहे आणि तो बहुतेक जाहिरातींमध्येही झळकत असतो. त्यामुळे त्याचे चाहतेही असंख्य आहेत यात काहीच शंका नाही. पण, एक वेळ अशी होती की, फक्त टेलिव्हिजन बघणा-यांनाच शाहरुख खान हे नाव माहित होते. दूरदर्शनवर १९८० नंतरच्या काही मालिकांमध्ये शाहरुख झळकला होता. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘सर्कस’. त्यावेळी त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते.
दरम्यान, शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सर्कस’ आणि ‘फौजी’ या दोन मालिकांमुळे शाहरुख प्रसिद्धीच्या झोतात आला होता. दूरदर्शनवर १९८९ साली दाखविण्यात आलेली ‘सर्कस’ ही मालिका आता पुन्हा दाखविण्यात येणार आहे. डीडी नॅशनलने ‘सर्कस’ ही मालिका पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून रात्री ८ वाजता ही मालिका तुम्हाला डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे.
Good news for @iamsrk Fans –
DON'T MISS @iamsrk's #Circus – Tv Series (1989) – From 19 Feb at 8 pm only on @DDNational pic.twitter.com/SZqEUPKqtn— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 13, 2017
शाहरुख खान हा टेलिव्हिजन क्षेत्राच्या कधीच विरोधात नव्हता. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलेले की, मला पुन्हा टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल. कारण काही गोष्टी तुम्ही केवळ दोन तासात सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला दहा तास लागतात. सर्कस या मालिकेचे दिग्दर्शन अझिझ मिश्रा आणि कुंदन शाह यांनी केले होते. ही मालिका ‘सर्कस’मध्ये काम करणा-या कलाकारांवर आधारित होती. हिंदुला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणालेला की, मी सर्व प्लॅटफॉर्मवर काम केलं आहे. मग ते थेटर असो, चित्रपट किंवा टेलिव्हिजन. पण, मला मनापासून टेलिव्हिजनचं आवडतं.