हॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्रीचे निधन झाले आहे. ‘बफी द व्हॅम्पायर स्लेअर’ आणि ‘गॉसिप गर्ल’मध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचे वयाच्या ३९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
मॅनहॅटन पोलिसांना बुधवारी (२६ फेब्रुवारी २०२५) सकाळी एक इमर्जेन्सी कॉल आला. त्यानंतर पोलीस तिच्या घरी पोहोचले, तिथे मिशेल ट्रॅचटेनबर्ग बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एपीने हे वृत्त दिलं आहे.
“तिच्याबरोबर काही गुन्हेगारी कृत्य घडलंय, असा संशय नाही. वैद्यकीय परीक्षक मृत्यूचं कारण काय आहे ते सांगतील. तपास सुरू आहे,” असं एनवायपीडीने म्हटलं आहे. तिच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी न्यूयॉर्क पोस्टने दिली होती.
मिशेल ट्रॅचटेनबर्गचे करिअर
मिशेलने निकेलोडियनच्या ‘द ॲडव्हेंचर्स ऑफ पीट अँड पीट’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी ती फक्त तीन वर्षांची होती. मिशेलने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘बफी द व्हॅम्पायर स्लेअर’मधील डॉन समर्सच्या भूमिकेसाठी डेटाइम एमीसह अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळवले होते. नंतर तिने ‘युरोट्रिप’, ‘आइस प्रिन्सेस’, ‘किलिंग केनेडी’ आणि ‘सिस्टर सिटीज’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मिशेलने नंतर ‘गॉसिप गर्ल’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ती खासकरून याच चित्रपटासाठी ओळखली जाते.
२०२१ मध्ये मीट, मॅरी, मर्डर ऑन टुबी या खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित माहितीपटांचे होस्ट म्हणून तिने काम केलं होतं. यानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसली नाही.
दरम्यान, मिशेलने २०२१ मध्ये ‘बफी द व्हॅम्पायर स्लेअर’चा निर्माता जॉस व्हेडनवर सेटवर चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिची को-स्टार करिश्मा कारपेंटरनेही तिचं समर्थन केलं होतं. व्हेडनच्या वर्तणुकीमुळे मानसिक आघात झाल्याचं ती म्हणाली होती.