Govinda Discharge from Hospital: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या पायाला मंगळवारी (१ ऑक्टोबर) राहत्या घरात गोळी लागली होती. यानंतर मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करून गोळी काढली, त्यानंतर आता तीन दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गोविदां म्हणाला, “मी बरा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी पूजाअर्चा करण्यात आली, लोकांनी आशीर्वाद दिले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माझी विचारपूस केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली, त्या सर्वांचे धन्यवाद मानतो. सर्वांच्या कृपेने मी आता सुखरुप आहे.”
यावेळी मंगळवारी सकाळी नेमकं काय झालं होतं, याचाही तपशील गोविदांनं माध्यमांशी बोलताना दिला.
मंगळवारी सकाळी मिसफायर झाल्याबाबत माहिती देताना गोविंदा म्हणाला की, मी कोलकाता येथे एका शोसाठी निघालो होतो. सकाळी पावणे पाचची वेळ होती. त्यावेळी बंदूक माझ्या हातून पडली आणि गोळी सुटली. सुरुवातीला झटका लागल्याचं मला जाणवलं. खाली वाकून पाहिलं तर रक्ताच्या धारा निघत होत्या. मला वाटलं यात इतर कुणाला सहभागी करू नये, यासाठी मी डॉ. अग्रवाल यांच्यासह क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो.
डॉक्टर काय म्हणाले?
क्रिटीकेअर एशिया हॉस्टिपटलचे डॉ. रमेश अग्रवाल यांनी गोविंदाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “गोविंदाला तीन ते चार आठवडे आराम करावा लागणार आहे. व्यायाम आणि फिजिओथेरपी सुरू ठेवावी लागेल. त्यांची प्रकृती आता बरी आहे, ते नेहमीप्रमाणे उत्साही आहेत. आहारही व्यवस्थित सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत.”
हे ही वाचा >> गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; अभिनेत्याच्या जबाबाशी पोलीस असहमत, पुन्हा होणार चौकशी
दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीही माध्यमांशी बोलताना डिस्चार्ज मिळत असल्याबाबत आनंद वाटतो, असे सांगितले.
सुनीता अहुजा म्हणाल्या की, माझे पती आज बरे होऊन घरी परतत आहे, याचा मला आनंद वाटत आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. थोड्याच दिवसांत ते पुन्हा नाचू-गाऊ लागतील. काही दिवसांनी ते पुन्हा काम सुरू करतील. घरी आता नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. उत्सवात ते घरी येतायत याचा आनंद वाटतो.