अमेरिकन आयडॉल स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका मंडिसा घरात संशयास्पद अवस्थेत मृत आढळली आहे. ती ४७ वर्षांची होती. फ्रँकलिन, टेनेसी येथील तिच्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे. कॅलिफोर्नियाच्या सायट्रस हाइट्समध्ये मंडिसाचा जन्म झाला होता. मंडिसा लिन हंडली असं तिचं पूर्ण नाव आहे. शुक्रवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंडिसाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बातमीने मंडिसाचे चाहते दु:खी झाले असून ते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहत आहेत. “मंडिसा काल तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली, या घटनेची आम्ही पुष्टी करतोय. या क्षणी आम्हाला तिच्या मृत्यूचे कारण किंवा इतर तपशील माहित नाहीत. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्रांसाठी प्रार्थना करा. मंडिसा ही जगभरात आयुष्यातील आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती,” असं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“हे खोटं आहे”, एकता कपूरने फेटाळला स्मृती इराणींचा ‘तो’ दावा; म्हणाली, “एका सेकंदात…”
मंडिसा तिच्या अप्रतिम आवाज व गायकीसाठी ओळखली जात होती. तिने २००६ मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. ती हा शो जिंकली नव्हती, पण इथे तिने आपल्या गायनाने लोकांची मनं जिंकली होती. ती या शोमध्ये नवव्या क्रमांकावर होती. यानंतर २००७ मध्ये तिने ‘ट्रू ब्युटी’ नावाचा म्युझिक अल्बम रिलीज केला. हा तिचा पहिला अल्बम होता.
यानंतर मंडिसाने अनेक सुपरहिट गाणी गायली आणि जगभरात तिचे चाहते आहेत. तिने तिच्या गायनासाठी मानाचा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता. आता तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.