प्रदर्शनाच्या दोन आठवडे आधीच चित्रपट इंटरनेटवर
‘मस्ती’ आणि ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटांच्या माध्यमातून अॅडल्ट कॉमेडी हा प्रकार बॉलीवूडमध्ये रुजवणाऱ्या दिग्दर्शक इंद्र कुमारला पायरसीमुळे जबरदस्त फटका बसला आहे. ‘मस्ती’चा तिसरा सिक्वल ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या नावाने २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मात्र दोन आठवडे आधीच या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी इंटरनेटवर उपलब्ध झाली आहे. गेल्या महिन्याभरात ‘उडता पंजाब’ या चित्रपटापाठोपाठ सलग दुसऱ्यांदा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची सेन्सॉर कॉपी उपलब्ध झाली असल्याने सेन्सॉर बोर्डाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उमटले आहे.
अनुराग कश्यप निर्मित ‘उडता पंजाब’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दोन दिवस आधी चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाली होती. त्यानंतर अनुराग कश्यप आणि निर्माते बालाजी प्रॉडक्शन यांनी या संदर्भात लगोलग सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगोलग कारवाई केली होती. या घटनेला महिनाही पूर्ण होत नाही तोवर इंद्र कुमार दिग्दर्शित ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ चित्रपटाचीही सेन्सॉर कॉपी लीक झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला दोन आठवडे शिल्लक आहेत आणि त्याआधीच चित्रपट फेसबुक, यू टय़ूबसह अनेक संकेतस्थळांवर सहज उपलब्ध झाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच चित्रपटाची लीक कॉपी इंटरनेटवर उपलब्ध झाली असल्याने या चित्रपटाला मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. अॅडल्ट कॉमेडी प्रकारातील या ‘मस्ती’पटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’चे बजेट ५ कोटी रुपये होते. या चित्रपटाने तिकीटबारीवर २६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
त्यानंतर सात वर्षांनी प्रदर्शित झालेला ‘ग्रँड मस्ती’ ही ३५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. मात्र या चित्रपटाला तिकीटबारीवर मिळालेला लोकांचा प्रतिसाद इतका मोठा होता की, १०० कोटींच्या बॉलीवूड क्लबमध्ये पोहोचलेला हा पहिला अॅडल्ट कॉमेटीपट ठरला. या चित्रपटाने १४५ कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटाला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादामुळे दिग्दर्शक इंद्र कुमारने तिसऱ्या सिक्वलचा घाट घातला. विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्माती योगायोगाने एकता कपूरच आहे. मात्र अजूनही निर्माते-दिग्दर्शकांनी या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसून त्यांची चर्चा सुरू असल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

Story img Loader