Untitled-1‘ग्रिप्स’चं नाटक बघणं हा मुलांकरता एक मजेचा आणि आनंददायक अनुभव असतो. मुळात जर्मनीत सुरू झालेल्या या नाटय़-चळवळीची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली त्याला आता जवळजवळ तीस वर्षे पूर्ण होतील. ‘ग्रिप्स’च्या नाटकांचं वैशिष्टय़ असं, की यात परिकथा, जादू, राक्षस असले विषय जाणीवपूर्वक टाळले जातात. त्याऐवजी मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले विषय त्यातून अतिशय खेळकरपणाने सादर केले जातात आणि मनोरंजनातून या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात मुलांच्या भावविश्वाचा संवेदनशीलतेने विचार करतानाच मोठय़ांना हलक्या कानपिचक्याही दिल्या जातात. म्हणूनच मुलांसाठी मस्त आणि मोठय़ांसाठी ‘मस्ट’ अशी या नाटकांची समर्पक ओळख करून दिली जाते.
‘ग्रिप्स’चे मराठीत आजवर अनेक उत्तम प्रयोग सादर करण्यात आले आहेत. ‘छान छोटे वाईट्ट मोठे’, ‘नको रे बाबा’, ‘पहिलं पान’, ‘गोष्ट सिंपल पिल्लाची’, ‘आम्ही आमचे राजे’, ‘पण आम्ही खेळणारच’, ‘प्रोजेक्ट आदिती’ हे त्यांपैकीच काही. दोन वर्षांपूर्वी मराठी व जर्मन लेखकत्रयींनी मिळून संयुक्तपणे लिहिलेल्या आणि मराठी व जर्मन या दोन्ही भाषांतून सादर केल्या गेलेल्या ‘डू आणि मी’ या नाटकाचाही खास उल्लेख करावा लागेल. ‘ग्रिप्स’च्या या नाटकांना आजवर छोटय़ा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘एकदा काय झालं!’ हे ‘ग्रिप्स’ परंपरेतलं एक नवं धमाल नाटक. यात एकच सलग कथासूत्र न ठेवता तीन-चार छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून मुलांच्या दैनंदिन जीवनातले ताणतणाव, बालमजुरी, मुलांचं लैंगिक शोषण, सोवळ्याओवळ्याच्या भ्रामक कल्पना या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्यांची उकलही खास ‘ग्रिप्स’ शैलीत केली गेली आहे. विशेषत: मुलांच्या मनावर आयुष्यभराकरता खोल परिणाम करणारा मुलांच्या लैंगिक शोषणाचा अतिशय महत्त्वाचा विषय यात संवेदनशीलतेने हाताळला आहे. अशा अनुभवापासून स्वत:चा बचाव कसा करायचा, याचे काही उपाय यात प्रभावीपणे मांडले आहेत. या नाटकातल्या प्रत्येक छोटय़ा गोष्टीचा विषय वेगळा असल्याने एक गोष्ट बघून संपली की पुढच्या गोष्टीत आता काय बघायला मिळेल, याची उत्सुकता कायम राहते.
मधल्या जागेत कलाकार आणि तीन बाजूंनी प्रेक्षक अशा रीतीने हे नाटक सादर केलं गेलं आहे. त्यामुळे  कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातलं अंतर कमी झाल्याने आणि काही वेळा प्रेक्षकांच्या पुढय़ात बसून, तर प्रसंगी त्यांच्यात मिसळून कलाकार अभिनय करत असल्याने मुलं अतिशय समरस होऊन नाटक बघतात. यातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षणीय झाली आहे. आणि त्यातले चटपटीत संवाद आपल्याला सतत हसवत ठेवतात. त्याचं श्रेय लेखिका विभावरी देशपांडे यांना द्यावं लागेल. श्रीरंग गोडबोले यांची गाणी आणि नरेंद्र भिडे यांचं संगीत कलाकारांना मस्त नाचायला आणि धांगडधिंगा घालायला एकदम फिट्ट जमलं आहे. राधिका इंगळे यांचं नेपथ्य नेटकं आणि नाटय़विषयाला उठाव देणारं आहे.
बॅकड्रॉप म्हणून एक मोठ्ठं पुस्तक आणि प्रत्येक नवी गोष्ट सुरू होताना त्या गोष्टीशी सुसंगत अशा फोटोंनी सजलेलं त्याचं पान उलटणं.. शिवाय पपेट्सचा कौशल्यपूर्ण वापर, घराघरांतून दिसणारी टीव्हीची चौकट आणि त्यातून चाललेली निर्थक, उथळ कार्यक्रमांची चटरपटर यांचा वापर विशेष उल्लेखनीय आहे.
‘ग्रिप्स’च्या परंपरेत तयार झालेल्या सर्वच कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा झाला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो अश्विनी राजपाठक आणि सक्षम कुलकर्णी यांचा. या सर्वाचा उत्तम मेळ राधिका इंगळे यांच्या दिग्दर्शनाने घातला आहे.  मुलांच्या दैनंदिन जगण्यातील काही समस्या आणि त्यावरचे उपाय खेळकर पद्धतीने मांडतानाच त्यातला आशय मुलांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवण्याच्या कसोटीत ‘एकदा काय झालं!’ सहीसही उतरतं. नाटक पाहताना मुलांबरोबर त्यांचे आई-बाबाच काय, पण आजोबा-आजीही समरस झालेले दिसतात, ही प्रयोग उत्तम जमल्याची पावतीच म्हणावी लागेल.
शुभदा चंद्रचूड

Story img Loader