लहान मुलांना घेऊन केलेलं नाटक म्हणजे बालनाटय़, अशी व्याख्या सरधोपटपणे काही जणं करतात, पण या गोष्टीला छेद देत ‘जे नाटक बालप्रेक्षकांसाठी केलं जातं,’ ते बालनाटय़, अशी व्याख्या करत ते अधिक सकस करण्याचं काम पुण्याचं ग्रिप्स थिएटर करताना दिसतं. बालनाटय़ांमध्ये परी, राजा, राक्षस, चेटकीण यांच्या कथांच्या कल्पनाविस्ताराला वाव न देता, या मुलांचे जे प्रश्न आहेत ते हाताळण्याचं काम ग्रिप्स थिएटर करतं आणि त्यामुळेच त्यांचं वेगळंपणही सिद्ध होतं.

ग्रिप्स थिएटरच्या नाटकांत लहान मुलं काम करत नाहीत. तर या बालनाटय़ांमध्ये मोठी मुलं किंवा माणसं लहान मुलांच्या भूमिका करतात. कारण लहान मुलांच्या समस्या जाणून घेऊन ते सादर करणं, हे लहान मुलांना जमणं कठीण असतं. त्यामुळे हे नाटक बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठय़ांना घेऊन ते बसवलं जातं. गेल्या ३१ वर्षांपासून पुण्यात ग्रिप्स थिएटर सुरू असून सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते आपली बालनाटय़ं सादर करत आहेत. ग्रिप्स थिएटर हे मूळचं जर्मनीतील बर्लिनमधलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी होरपळून निघाली होती. समस्यांचा ढीग पडला होता. त्यामुळे लहान मुलांना आपल्या समस्या मांडण्याचं व्यासपीठ मिळावं, असं फोल्कर लुडविग यांना वाटलं. लुडविग हे विद्यार्थी चळवळीत होते. त्यामुळे मुलांच्या समस्या त्यांना माहिती होत्याच. त्यामुळे बालनाटय़ांच्या माध्यमांतून त्यांच्या सामाजिक समस्या मांडण्याचं त्यांनी ठरवलं. त्यामध्ये मुलं या जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, हेदेखील सामावून घेतलं. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ही संकल्पना पुण्यात रुजवली आणि १९८६ साली ग्रिप्स थिएटरची स्थापना झाली. सुरुवातीला काही जर्मन बालनाटय़ांचे अनुवाद केले गेले. पण त्यानंतर आपल्याकडील समस्यांना या बालनाटय़ांतून वाचा फोडली गेली. लेखक श्रीरंग गोडबोले हे गेली ३१ वर्षे ग्रिप्स थिएटरशी जोडले गेले आहेत.

आपल्याकडे बालनाटय़ाच्या व्याख्येत गोंधळ आहे. पण ग्रिप्स थिएटरच्या माध्यमातून मुलांसाठी केलेलं नाटक म्हणजे बालनाटय़, हे मनाशी पक्कं झालं. सध्याच्या घडीला बालनाटय़ चळवळीचा दर्जाही सुमार आहे, त्यामागे न लागता ग्रिप्स थिएटर सातत्यपूर्ण सकस काम करत आहे. डॉ. मोहन आगाशे यांनी आम्हाला ग्रिप्स थिएटरची ओळख करून दिली. विशेष म्हणजे या बालनाटय़ांमध्ये मोठी माणसं काम करतात. कारण मुलांच्या समस्या समजण्याची समज लागते, ती मोठय़ा माणसांमध्ये असते आणि ते समजून त्याचे प्रभावी सादरीकरणही त्यांच्याकडून दिसते. आत्तापर्यंत हजारो प्रयोग ग्रिप्स थिएटरच्या माध्यमातून आम्ही केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी ज्यांनी ही बालनाटय़ं पाहिली त्यांची मुलं आणि नातवंडं येऊन हे प्रयोग पाहतात, यामध्येच ग्रिप्स थिएटरचं यश आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबरोबर आम्ही काही नाटकांची निर्मितीही केली आहे, जी भारतभर दाखवली जातात. त्याचबरोबर ग्रिप्सची नाटकं जर्मनीलाही जाऊन आली आहेत, असे गोडबोले सांगतात.

सुरुवातीची दहा वर्षे थिएटर्स अकादमीने ग्रिप्स थिएटर चालवलं, पण त्यानंतर गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र ग्रिप्स थिएटर पाहत आहे. या थिएटरला सरकारी देणगी नाही. पण काही हौशी कलाकारांनी एकत्र येऊन निर्मिती केलेल्या बालनाटय़ांना मोठा वर्ग आहे. ग्रिप्सच्या बालनाटय़ांचा प्रभाव केवढा मोठा असू शकतो, याचं एक उदाहरण पाहा. ‘बोल बिनधास्त’ हे नाटक ग्रिप्सने लहान मुलांच्या लैंगिग शोषणावर बसवलं, त्याचे ३० प्रयोगही झाले आहेत. हे नाटक पाहायला एक विद्यार्थिनी आली होती. तिचे सावत्र वडीलंच तिचं शोषण करत होते. पण ही गोष्ट यापूर्वी सांगायला ती धजावत नव्हती. तिने हे नाटक पाहिलं. तिला धीर आला. आपल्या बरोबर असलेल्या व्यक्तींना तिने ही दुर्दैवी गोष्ट सांगितली आणि त्यांच्याबरोबर ती पोलिसांकडे गेली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्या नराधमाला अटक केली. एका बालनाटय़ामुळे अशी जागृती घडली. ग्रिप्स थिएटरला अजून कोणती पोचपावती हवी, त्यांच्या कामाचे हे फलितच म्हणावं लागेल. ग्रिप्सच्या नाटकांमध्ये तुम्हाला कधीही फँटसी दिसणार नाही. ते पाहायचे असेल तर बॉलीवूडचे सिनेमे आहेत. लहान वयापासून मुलांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणं, हे आमचं काम आहे. या बालनाटय़ातून आम्ही कोणतेही उपदेश देत नाही. जी समस्या आहे ती चोखपणे मांडतो. रंजन करता करता या लहान मुलांपर्यंत संदेश कसा पोहोचवता येईल, याकडे आम्ही अधिक लक्ष देतो. आमची नाटकं ही वास्तवाला अधिक चिटकून राहतात. सध्याच्या घडीला राधिका इंगळे आणि विभावरी देशपांडे या दोघी मन लावून ग्रिप्सची नाटकं बसवत आहेत, असे प्रमोद काळे सांगत होते. तुम्हाला चांगला समाज आणि नागरिक घडवायचे असतील तर त्यासाठी लहान मुलांवर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. ग्रिप्सच्या माध्यमातून लहान मुलांना वास्तवाची ओळख करून दिली जाते. आपला समाज, त्यामधल्या समस्या आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सारं हसत-खेळत दाखवत ग्रिप्स थिएटरमार्फत त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवले जात आहेत, मुलांना अधिक वास्तवदर्शी बनवलं जात आहे. एकेकाळी आपण पाहिलेलं नाटक आपल्या मुलांनी, नातवंडांनी पाहावं, असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या बालनाटय़ांचा दर्जा काय असावा, याबद्दल मनात शंकाच नसावी.

अजून बरंच काम ग्रिप्स थिएटरला करायचं आहे. ग्रिप्स थिएटर ते नक्कीच करेल. पण फक्त एका हाताने टाळी वाजत नाही. दुसऱ्या बाजूने काही संस्थांनी आपला समाज परिपक्व करण्यासाठी ग्रिप्स थिएटरची मदत करणंही गरजेचं आहे. त्यांना आर्थिक मदत करावी असंच काही नाही. त्यांची नाटकं जर आपल्या भागात दाखवली तर आपल्या आजूबाजूचा समाजही प्रगल्भ होऊ शकतो, हे ध्यानात ठेवायला हवं. एकप्रकारे समाजप्रबोधनाचं काम ग्रिप्स थिएटर करत आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही.

Story img Loader