स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना दक्षिण मुंबईतर्फे गुढीपाडव्यानिमित्त एकाच मार्गावर काढण्यात आलेल्या दोन स्वतंत्र शोभायात्रांमुळे अवघा गिरगाव दुमदुमला. ध्वजपथक, ढोलपथक, लेझीम, नाशिकबाजा, कच्छी बाजाच्या गुंजनात गिरगावकर हरपून गेले. दोन्ही यात्रांमध्ये विविध सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांचे चित्ररथ आकर्षण बनले होते. मात्र प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रथम पारितोषिक मिळविलेला महाराष्ट्र शासनाचा ‘पंढरीची वारी’ हा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या यात्रेतील रथ मुख्य आकर्षण ठरला होता. मात्र, शिवसेनेची यात्रा पुढे सरकेपर्यंत स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या यात्रेतील आबालवृद्धांना भर उन्हात तब्बल दोन तास उन्हात ताटकळत राहावे लागले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवारी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली होती. गिरगावातील फडके गणपती मंदिरात गुढी आणि पंचांगाचे गिरगाव चौपाटी येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोविंद दास यांच्या हस्ते पूजन करून यात्रा मार्गस्थ झाली. त्याच वेळी गिरगावातील आर्यन हायस्कूलजवळून शिवसेना दक्षिण मुंबईच्या हिंदू नववर्ष दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. दिंडी सोहळ्यातील जगदंब ढोल-ताशा पथकाने गिरगाव चर्चच्या चौकात केलेल्या प्रात्यक्षिकानंतर ही यात्रा सुरू झाली.
या यात्रेतील पांडुरंगाची भव्य मूर्ती, त्यापाठोपाठ वारकऱ्यांची दिंडी आणि सध्या गाजत असलेल्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या वादाबाबतचा चित्ररथ, स्वाइन फ्लूवरील मार्गदर्शनाचा चित्ररथ यात्रेचे आकर्षण बनला होता. आर्यन शाळेजवळून सुरू झालेली यात्रा जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरून हळूहळू पुढे सरकत होती. तोपर्यंत स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यात्रा गिरगाव चर्चजवळील चौकात पोहोचली. मात्र शिवसेनेची यात्रा संथ गतीने पुढे सरकत असल्यामुळे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यात्रा तब्बल दोन तास ताटकळली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर शिवसेनेची यात्रा पुढे सरकू लागली आणि भरदुपारी १२ वाजता गिरगाव चौक रिकामा झाला. त्यानंतर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या यात्रेत सहभागी झालेल्या गिरगाव ध्वजपथक आणि गजर ढोल पथकाने आपला आविष्कार सादर केला. हा आविष्कार ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी तमाम गिरगावकरांनी गर्दी केली होती. रांगोळी आणि ढोलपथकाच्या जुगलबंदीने दर्शक थक्क झाले. त्यानंतर ही यात्रा हळूहळू पुढे सरकली आणि ठाकूरद्वार नाक्यावर झालेल्या छोटेखानी सभेमध्ये माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी गिरगावकरांना शुभेच्छा दिल्या. उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. मात्र तरीही तमाम गिरगावकर या यात्रेच्या स्वागतासाठी दुतर्फा उभे होते. या यात्रेतील स्वामी समर्थाची पालखी, दुचाकीवरील महिलांचे आदिशक्ती पथक, तरुणांचे युवाशक्ती पथक, लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेली श्री रामाची २२ फूट उंच मूर्ती, आर. के. लक्ष्मण यांची स्मृती जागविणारा चित्ररथ या यात्रेची वैशिष्टय़े होती.
चिराबाजार येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या यात्रेत सहभागी झाले आणि त्यांनी गिरगावकरांना शुभेच्छा दिल्या. तसेच चिराबाजार येथील शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे आणि प्रमोद नवलकर सभागृहाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या यात्रेमुळे रखडलेल्या स्वामी युवा प्रतिष्ठानच्या यात्रेची दुपारी ४.३० च्या सुमारास धोबीतलाव येथील शामलदास गांधी मार्गावर सिद्धिविनायक दर्शन सोहळा आणि महाआरतीने तमाम गिरगावकरांच्या उपस्थितीत सांगता झाली.
नववर्षस्वागताची जल्लोषयात्रा
ध्वजपथक, ढोलपथक, लेझीम, नाशिकबाजा, कच्छी बाजाच्या गुंजनात गिरगावकर हरपून गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-03-2015 at 05:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa celebration