गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत तरुणांचा उत्साह अवर्णनीय होता. मागील पाच दिवसांपासून डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या वतीने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वागतयात्रेची पूर्वतयारी करण्यात येत होती. आज सकाळी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानातून निघालेल्या स्वागतयात्रेत ६३ चित्ररथ सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती यात्रेत जास्त प्रमाणात दिसून आली.
गणेश मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या गणेशाच्या पालखी सोहळ्याने या यात्रेची सुरुवात झाली. सकाळी साडे सहा वाजता पालखी मैदानात येताच ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. हजारो नागरिकांचा सहभाग आणि तितकेच संस्था व विविध विषयांवरील त्यांचे चित्ररथ हे या स्वागतयात्रेचे वैशिष्टय़ होते. यंदा प्रथमच महिलांनी या यात्रेची धुरा सांभाळली असल्याने महिला संरक्षणविषयक चित्ररथ तसेच मुली वाचवा हा संदेशही संस्थांनी दिला. यात्रेत नऊवारी साडी लेवुन बुलेट व बाईकवर महिला स्वार झाल्या होत्या. मुली वाचवा याविषयी जनजागृती होत असतानाही स्त्री भ्रूणहत्या रोखू शकलेलो नाही. आपण त्याविषयी स्वाक्षरी मोहीम संस्थांच्या वतीने राबविण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या यात्रेत लेझीमपथक, ढोलपथक, झांजलेझीम पथक सहभागी होते. छोटय़ा पडद्यावर गाजत असलेली मालिका जय मल्हारचा फीवर स्वागतयात्रेवर दिसून आला. स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने जेजुरीचा माहोल तयार करण्यात आला होता. खंडोबा, म्हाळसा व बानूसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईही इच्छुक असलेली दिसली, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या मुलामुलींचे आधारतीर्थ आधाराश्रमच्या वतीने सहभागी झालेली मुले पाहून अनेकांची मने हेलावत होती. यांसोबतच योग विद्याधाम, क्षितिज मतिमंद मुलांची शाळा, भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था, मैत्री महिला मंडळाने मुलगा आणि मुलीतील फरक तराजूत तोलून दाखविणारा चित्ररथ साकारला होता. द कल्याण जनता सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविधतेतून एकता सादर केली. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यंदा प्रथमच काव्य रसिक मंडळ, घरेलु कामगार संस्था, ठाणे जिल्हा, भारतीय मजदूर संघ, महावितरण, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांसह काही संस्थांनी पारंपरिकतेला साजेसे असे तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदंगाच्या नादावर  ठेका धरला होता. सौर ऊर्जेवर चालणारी दुचाकी ही सर्वाच्या उत्सुकतेचा विषय ठरली होती. स्वागतयात्रेचे स्वागत करण्यासाठी चौकाचौकात संस्कार भारतीच्या वतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आनंदवन येथील कलाकारांनी गणेश मंदिर परिसरात धान्याच्या साहाय्याने रांगोळीच्या माध्यमातून बाबा आमटे व मंदाकिनी आमटे यांचे व्यक्तिचित्र साकारले होते.  
मोदी ब्रिगेडच्या वतीने शहरात स्वागतयात्रेच्या वेळी ठिकठिकाणी २५ कचरापेटय़ा ठेवण्यात आल्या होत्या. संत गाडगेबाबा अभियानाच्या ट्रकनेही शहर स्वच्छतेत हातभार लावला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका पाहता प्रत्येक पक्षाच्या अधिकारी स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्या विविध संस्थांचे स्वागत करत होते. दोन दोन मिनिटांच्या अंतरावर सेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे यांनी आपले स्टेज उभारले होते. एरवी शहरात कुठेही न दिसणारे पदाधिकारी स्वागतयात्रेच्या निमित्ताने नागरिकांच्या दृष्टीस पडले.