सणासुदीचे दिवस मराठी मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आणि मालिकेतील कलाकारांसाठीही कायम महत्त्वाचे ठरत आले आहेत. आत्ता-आत्तापर्यंत होळीची पूजा आणि धुळवडीची गंमतजंमत दाखवण्यात रंगलेली मालिकेतील कुटुंबे त्यातून जरा कुठे बाहेर पडत आहेत तोवर मराठी मनांचा मानाचा गुढीपाडव्याचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. दिवसाचे २४ तास मालिकांचा रतीब घालत मनोरंजनाची गुढी उभारणाऱ्या वाहिन्यांनी आणि त्यावरील प्रसिद्ध कुटुंबांनी नव्या वर्षांचे सेटवर अगदी जल्लोषात स्वागत केले आहे.
मालिकांमधील घरोघरी पुढच्या आठवडय़ात केवळ गुढीपाडव्याची जादू दिसली तर नवल वाटायला नको. वर्षांतील प्रत्येक सण हल्ली आपल्या आवडत्या कुटुंबांकडून निगुतीने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा तर मराठी माणसाचा नववर्षांचा सण.. त्यामुळे घरोघरी आनंदाची गुढी उभारायलाच हवी. सध्या मराठी वाहिन्या आपल्या प्रत्येक मालिकेत गुढीपाडव्याचा सण कशा पद्धतीने साजरा करता येईल याच्या तयारीत गुंतल्या आहेत. काही मालिकांनी सेटवरच्या गुढीपाडव्याचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे, तर काहींचे चित्रीकरण येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. सेटवरचा गुढीपाडवा हा वेगळाच अनुभव असतो. घरच्यांबरोबर सण साजरा करण्याआधी सेटवरच्या आपल्या जिवलगांबरोबर कलाकार पहिल्यांदा हा सण साजरा करतात. मालिकांमधील त्यांच्या कुटुंबात घडलेल्या कुरबुरी अधिक रंगवायला किंवा त्याचा ताण थोडा हलका करायला एकत्र येणारी मंडळी पाहून प्रेक्षकांनाही सणाचा आनंद हसतमुखाने घेता येतो. त्यामुळे पुढच्या आठवडय़ातही गुढीपाडव्याच्या निमित्ताने या कुटुंबांच्या कथाही पुढे सरकणार आहेतच, मात्र जोडीला एकत्र सण साजरा करण्याचा आनंदही ते प्रेक्षकांना देऊ करणार आहेत.
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत गुढीपाडवा साजरा होतो आहे. मराठी आणि कानडी प्रेमी युगुलाची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेत नुकतेच कुठे अर्जुन आणि रेवथी यांच्यात प्रेम फुलू लागले असून गुढीपाडव्याचा सण त्यांनी एकत्र साजरा केला आहे. रेवथी कानडी भाषिक असल्याने त्यांच्या घरी त्यांचा उदगी हा सणदेखील साजरा होताना आपल्याला दिसेल. उदगी हा सण कर्नाटकात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. मराठी मुलगा अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या प्रेमकहाणीमध्ये पुढे काय होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप आणि गौरीने यंदा चिमुकल्या लक्ष्मीसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे, तर याच वाहिनीवर सध्या टीआरपीत नंबर वन असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली जाणार आहे. अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडव्याचा सण असल्याने या नवदाम्पत्याने गुढीपाडव्याची पूजा केली आहे. ‘झी मराठी’वरही ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणताय सासूबाई’ या मालिकेत सासू-सुनांची जोडी धम्माल सजली आहे. कुटुंबाबरोबर गुढी उभारण्याबरोबरच काहीशी बाइकगिरी करतानाही सूनबाई दिसणार आहेत, तर ‘दार उघड बये’ या मालिकेतही मुक्ता आणि सारंग आपल्या समस्त नगर कुटुंबाबरोबर हा सण साजरा करताना दिसणार आहेत.