‘पद्मावती’ सिनेमाचे प्रदर्शन जस जसे जवळ येतेय तसे या सिनेमाची संकटं वाढताना दिसत आहेत. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा प्रख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे.

या सिनेमाला अनेक संघटनांकडून सुरुवातीपासूनच विरोध होत होता. आता भाजपकडूनही या सिनेमाला विरोध करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांच्यानंतर आता गुजरातमधील भाजपने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यास सांगितली आहे. भाजपने निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात पद्मावती सिनेमा क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावू शकतो त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधींना दाखवण्याची मागणी केली आहे. असे केल्याने सिनेमाच्या प्रदर्शनात अडथळे येणार नाही आणि तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

गुजरात निवडणूकीनंतर प्रदर्शित व्हावा ‘पद्मावती’
भाजप प्रवक्ते आणि राजपूत नेता आय. के. जडेजा यांचे पद्मावती संदर्भातील एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. जडेजा यांनी भन्साळी यांना दोन पर्याय दिले असून सिनेमावर बंदी घालण्यात येईल किंवा गुजरात निवडणुकीनंतर सिनेमा प्रदर्शित करावा. जडेजा म्हणाले की, पक्षाला राणी पद्मिनी यांची चुकीची प्रतिमा सिनेमात दाखवण्यात येईल याची भिती आहे. सिनेमात राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात प्रणयदृश्य दाखवण्यात आल्याचे म्हटले जात होते. सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून गुजरातमधील निवडणुका या ९ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार आहेत.

राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात प्रणयदृश्य चित्रित केली असल्याचे वाटत असल्यामुळेच करणी सेनेने सिनेमाला विरोध केला होता. मनोरंजनासाठी इतिहास बदलला जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. सिनेमात पद्मिनी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यास गुजरातमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचे संघटनेने सांगितले. जानेवारीमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावती सिनेमाच्या सेटची नासधूस करत भन्साळी यांना मारहाण केली होती. तसेच गुजरातमध्ये प्री-स्क्रिनिंगशिवाय जर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला तर राज्यात हिंसक प्रदर्शन करण्यात येईल असा इशारा वाघेला यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

Story img Loader