बुंदेलखंडमध्ये जिथे भ्रष्टाचार, व्यसने-जातीपातीची समाजव्यवस्था अशा सगळ्या कुप्रथा विळखा घालून बसलेल्या आहेत त्या प्रदेशात कोणी एक संपत पाल नावाची महिला उभी राहते आणि आपल्यासारख्याच इतर बायकांना गोळा करून लढा देते. गुलाबी साडय़ा घातलेल्या बायकांनी स्वत:साठीच उभी केलेली ही समांतर न्यायव्यवस्था अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका असलेल्या ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून संपतच्या या गुलाबी गँगची कथा पडद्यावर येणार आहे. मात्र, त्याआधी निष्ठा जैन यांनी दिग्दर्शित केलेली ‘गुलाबी गँग’ प्रदर्शित होणार आहे. अर्थात एक सिनेमा आहे तर दुसरा माहितीपट.
निष्ठा जैन यांनी या गुलाबी गँगबरोबर राहून त्यांच्या लढय़ाची कथा आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. एकाचवेळी आपल्या व्यसनाधीन नवऱ्यांना फटकावणाऱ्या, भ्रष्टाचारी नेत्यांना कायद्याच्या भाषेत अद्दल घडवणाऱ्या या गुलाबी गँगची खरी लढाई निष्ठा जैन यांनी ‘गुलाबी गँग’ या माहितीपटातून पुढे आणायचे ठरवले. मात्र, हा माहितीपट असला तरी त्याची लांबी चित्रपटाएवढीच आहे. ९६ मिनिटांचा हा माहितीपट रंजक आणि बोधकही आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याला मार्केटिंग आणि वितरण चोख हवे होते. म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारायचे ठरवले, अशी माहिती चित्रपटाचे वितरक आणि सादरकर्ते सोहम शहा यांनी दिली. आनंद गांधी दिग्दर्शित ‘शीप ऑफ थिसस’चा निर्माता आणि अभिनेता ही सोहमची ओळख. सोहम आणि आनंद गांधी यांनी ‘रिसायकलवाला लॅब’ ही निर्मितीसंस्था सुरू केली असून या बॅनरखाली वेगळ्या धाटणीचे चित्रपट, माहितीपट, लघुपट यांना वितरण आणि प्रसिध्दीसाठी मदत करायची, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.
‘गुलाबी गँग’ हा या बॅनरच्या मदतीने प्रदर्शित होणारा पहिलाच माहितीपट आहे. त्यामुळे सोहम आणि आनंद यांनी खास पत्रकार परिषद घेऊन या माहितीपटाची आणि निष्ठा जैन यांची ओळख माध्यमांना क रून दिली. लोकांचा एकंदरीतच सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यासाठी काळाच्या पुढचा विचार मांडणारे, वास्तवाचे भान आणणारे चित्रपट आजच्या पिढीसमोर आले पाहिजेत, यासाठी ‘रिसायकलवाला लॅब’ प्रयत्नशील असून येत्या काळात आमच्याकडून फारच चांगले चित्रपट लोकांसमोर येणार आहेत, असे आश्वासन आनंद गांधी यांनी यावेळी बोलताना दिले. ‘गुलाबी गँग’ची निर्मिती नॉर्वेस्थित पिराया फिल्म्सने केली असल्याने हा माहितीपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे. परदेशात प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय माहितीपट असेल, असेही सोहम शहा यांनी सांगितले. आत्तापर्यंत माधुरी आणि जुही चावला यांची आमनेसामने टक्कर असलेल्या ‘गुलाब गँग’ चित्रपटाची हवा होती पण, त्याआधीच संपतची लढाई ‘गुलाबी गँग’ या माहितीपटातून समोर येणार असल्याने ‘गुलाब गँग’ हा केवळ माधुरी आणि जुहीच्या जुगलबंदीपुरतीच उरणार असे दिसते.
माधुरीच्या ‘गुलाब गँग’वर ‘गुलाबी गँग’ची कुरघोडी
बुंदेलखंडमध्ये जिथे भ्रष्टाचार, व्यसने-जातीपातीची समाजव्यवस्था अशा सगळ्या कुप्रथा विळखा घालून बसलेल्या आहेत त्या प्रदेशात कोणी एक संपत पाल नावाची महिला उभी राहते
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabi gang to release before madhuri dixits gulaab gang