Gulabi Sadi Marathi Song : अलीकडच्या काळात सोशल मीडियावर एखादी गोष्ट हिट झाली की, सर्वत्र त्याचीच चर्चा रंगते. गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्राम रील्स पाहायला सुरुवात केल्यावर दर एक-दोन गाण्यांनंतर आपल्याला ‘गुलाबी साडी’ या गाण्याचा एक तरी व्हिडीओ पाहायला मिळतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये संजू राठोडचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या मराठमोळ्या गायकाच्या गाण्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या वरातीत तर सगळे सेलिब्रिटी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर मनसोक्त नाचले.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेलं हे सुपरहिट गाणं संजू राठोडने नेमकं कधी लिहिलं असेल? यामागची नेमकी गोष्ट काय? याबद्दल संजूने नुकत्याच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. गायक संजू राठोड म्हणतो, “‘गुलाबी साडी’च्या आधी माझं ‘नऊवारी साडी’ हे गाणं खूप व्हायरल झालं होतं. त्यालाही जवळपास १४० मिलियन व्ह्यूज आहेत. त्यानंतर मी विचार केला की, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतो. बहुतांश महिलांना हा गुलाबी रंग आवडतो अन् साडी तर सर्वांनाच आवडते. त्यामुळे गुलाबी रंगाच्या साडीवर आपण काहीतरी लिहूयात असं मला वाटलं.”

हेही वाचा : मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडीओ चर्चेत; प्रदीप खरेराची होणारी पत्नी कोण? जाणून घ्या

गुलाबी साडी गाणं का लिहिलं? ( Gulabi Sadi )

संजू पुढे म्हणाला, “मी कोणालाही समोर ठेवून हे गाणं लिहिलेलं नाही. मी सगळ्या स्त्रियांना उद्देशून हे गाणं लिहिलं आहे. माझ्या आईला सुद्धा गुलाबी रंग खूप जास्त आवडतो. अर्थात जे सर्वांना आवडणार असंच काहीतरी मला करायचं होतं… म्हणून, या संकल्पनेला धरून गाण्याची निर्मिती केली.”

“मी नेहमी गाणं लिहितानाच त्याला कंपोझ करत असतो. माझ्या डोक्यात एक धून आधीच तयार असते त्याला अनुसरुन मी गाण्याच्या पुढच्या ओळी लिहितो. त्यानंतर मग मी हे संपूर्ण गाणं थोडक्यात तयार करून गौरवला ( म्युझिक प्रोड्युसर ) देतो.” असं संजू राठोडने सांगितलं. ‘गुलाबी साडी’ ( Gulabi Sadi ) या गाण्याची संपूर्ण चाल गौरवने एक तासात रचल्याचं यावेळी दोघांनीही सांगितलं.

हेही वाचा : Video : जोडी नंबर १! रितेश देशमुखने बायकोसह शेअर केला मजेशीर व्हिडीओ! नेटकरी म्हणाले, “वहिनी दादांचं…”

गौरव यावर म्हणतो, “आधी आमचं ‘नऊवारी साडी’ गाणं व्हायरल झालं होतं. त्यामुळे जेव्हा गाणं पाहिलं तेव्हा मला असं वाटलं अरे पुन्हा कसं याने साडीवर गाणं राहिलं. मी त्याला यावेळी साडी नको काहीतरी वेगळं ट्राय करू असं देखील म्हणालो होतो. पण, दादा ठाम होता. एकंदर सगळा विचार करून मी हे गाणं एका तासात बसवलं.”

Gulabi Sadi
संजू राठोड ( Gulabi Sadi )

दरम्यान, संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याला सध्या सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत असून, या गाण्यावर बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत सर्वांनी व्हिडीओ बनवले आहेत.