‘गुलाबजाम’ असं गोड नाव असलेला चित्रपट असू शकतो? आणि त्यात नावाप्रमाणेच खाद्यपदार्थ, ते बनवण्याची प्रक्रिया, त्यामागचे प्रेमळ हात आणि त्याचा जिभेवर उतरणारा गोडवा यावर आधारित असेल, अशी कल्पना करणं तसं धाष्टर्य़ाचं ठरेल. पण मराठीत असे विषयानुरूप प्रयोग करणारी दिग्दर्शक मंडळी आहेत ज्यात सचिन कुंडलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सध्या प्रोमोजच्या निमित्ताने राधाच्या कढईतून अलगद आदित्यच्या तोंडात शिरणारे ‘गुलाबजाम’ घराघरांत पोहोचले आहेत. मात्र या ‘गुलाबजाम’च्या भोवतीने दिसणारे आदित्य आणि राधा, त्यांची कथा नेमकी काय आहे, हा फक्त पदार्थाचा गोडवा आहे की कुंडलकर यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे त्यात नात्यांचा गोडवा रंगवण्यात आला आहे, या अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दिग्दर्शक सचिन कुंडलकर, राधा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर हे त्रिकूट आणि हा ‘गुलाबजाम’ आपल्यापर्यंत पोहोचवणारे ‘झी स्टुडिओ’चे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला खास भेट दिली..

‘आशयघन मराठी चित्रपटनिर्मितीसाठी हा उत्तम काळ ’

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

दिग्दर्शक म्हणून एखाद्या गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे ‘सिनेमा’, असे माझे मत आहे. या भावनेतूनच मी चित्रपटांची निर्मिती करत असतो. ‘गुलाबजाम’ या चित्रपटाच्या दृष्टीने या भावनेविषयी बोलायचे झाल्यास नि:स्वार्थी मनाने दररोज आपल्याला स्वयंपाक बनवून खाऊ घालणाऱ्या व्यक्तिप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची संहिता बांधली गेली आहे. ‘संस्कृती’ ही गोष्ट नदीच्या प्रवाहासारखी आहे. ती कधीही लयास न जाणारी आहे. त्यामुळे दुकानाच्या पाटय़ा बदलून किंवा मराठीच बोला असे दामटवून ‘संस्कृती’ टिकली जाईल, असे मला वाटत नाही. महाराष्ट्राला मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. या संस्कृतीविषयी आजवर व्यक्त न झालेल्या प्रेमाचा संचय या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सध्याच्या स्थलांतरणाच्या युगात आपण आपल्या भाषा आणि पोषाख जपण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपली खाद्यसंस्कृती जपली जाते का, यावर भाष्य करण्याची गरज असल्याचे मला जाणवले. शिवाय पदार्थाच्या जाहिरातींमध्ये त्यांचा आकर्षकपणा टिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मात्र या चित्रपटामध्ये पदार्थाची मांडणी, ती तयार करण्याची प्रक्रिया, प्रक्रियेतील साहित्य याला घरचेपणाची जोड दिली गेली पाहिजे याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात आले आहे. एखादा पदार्थ खाताना त्याच्याशी जोडलेल्या माणसाशी आपलं वेगळं नातं असतं. हे नात उलगडण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांचा चित्रपटाविषयी असणारा साचेबद्धपणा आणि त्यामागील सांख्यकीय गणिते मराठी चित्रपटसृष्टीत नाहीत. इथल्या प्रत्येक कलाकारावर मराठी प्रेक्षक प्रेम करतो. प्रत्येक कलाकार पात्र आणि कथेविषयी असणारं आव्हान स्वीकारण्याचं धाडस करतो. त्यामुळे सध्याचा काळ हा मराठी चित्रपटांच्या निर्मितीकरिता उत्तम काळ असल्याचे मला वाटते.

या चित्रपटाचे कथासूत्र थोडक्यात सांगायचे तर लंडनमध्ये राहणारा आदित्य हा मराठमोळ्या जेवणाच्या शोधात भारतात येतो. त्याला लंडनमध्ये महाराष्ट्रीय पदार्थाचं रेस्टॉरंट काढायचं आहे. त्यासाठी तो पुण्यात येतो आणि तिथे त्याची भेट उत्तम स्वयंपाक करणाऱ्या राधाशी होते. त्यानंतर आदित्य, राधा आणि मराठी जेवण यावर कथेचा गोफ विणला गेला आहे. सोनालीचं खाद्यसंस्कृतीवर प्रेम आणि त्यावर विश्वास असल्यामुळे राधा या पात्रासाठी तिची निवड आपसूक झाली. तर सिद्धार्थबरोबर याआधी ‘वजनदार’ चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या अभिनय कौशल्याची आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ मला पडली होती. त्यामुळे त्याच्यासाठी आदित्य हे पात्र लिहिलं गेलं. – सचिन कुंडलकर, दिग्दर्शक

 

‘राधाशी एक जवळीक निर्माण झाली’

सचिन हा माणूस म्हणून उत्तम असल्याने त्याची कलाकृती ही दर्जेदार असते. त्याला नेमकं काय मांडायचं आहे, याचं मूर्तरूप संहितेमध्ये उतरत असल्यामुळे शिवाय त्यामध्ये कलाकारांच्या भावनांचे प्रतिबिंब पडल्यामुळे त्याच्या चित्रपटात काम करण्याची मजा निराळी असते. मुळातच हा खाद्यसंस्कृतीवर आधारित सिनेमा असल्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी आम्ही सहजसोपे पदार्थ बनवत होतो. शिवाय गृहिणी असल्या कारणाने जेवण बनवतानाचे चित्रीकरण करताना त्या सगळ्या वातावरणाशी आपलेपणा निर्माण झाला होता. चित्रपटात साकारलेली राधा देखील उत्तम स्वयंपाक करणारी आहे. प्रत्यक्षात मलाही माझ्या हाताने पदार्थ बनवून ते लोकांना खायला घालायला आवडतं. त्यामुळे असेल पण राधा या पात्राशी जवळचा संबंध निर्माण झाला. राधा हे पात्र एखाद्या कवितेसारखे आहे. असे पात्र सध्या सहज लिहिले जात नाही. कवितेत ज्याप्रमाणे विविध भावनांचे ऋणानुबंध असतात तसेच वेगवेगळे पैलू हे राधाच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. ती तिच्या स्वयंपाकाबाबत खूप आग्रही आहे. आपला स्वयंपाक उत्तमच झाला पाहिजे याकडे तिचे लक्ष आहे. या सगळ्या सूक्ष्म गोष्टी माझ्यामध्येही असल्यामुळे ती भूमिका सहजरीत्या साकारली गेली. जेवण बनवणे हा व्यवसाय असू शकत नाही, ही भावना मनात असल्याने भूमिकेला न्याय देऊ शकले असे मला वाटते.   – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

 

‘सुवर्णमध्य काढावा लागतो’

मराठी खाद्यसंस्कृतीमध्ये समृद्धता असूनही शंभर मराठी लोकं एकत्र जमली तर त्यांच्याकडून तिसऱ्याच पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. आपल्या खाद्यसंस्कृतीचा उत्साह त्याचा सोहळा साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्यामुळे या भावनेविषयी जाणीव असल्याने हा चित्रपट करावासा वाटला. मला वैयक्तिकरीत्या स्वयंपाक बनवण्यापेक्षा तो बनविण्याची प्रक्रिया बघण्यामध्ये मजा येते. लहानपणी आईला स्वयंपाकामध्ये केलेल्या छोटय़ा-छोटय़ा मदतीचे प्रसंग पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता आले. आदित्य हा मराठी खाद्यसंस्कृतीच्या शोधार्थ लंडनहून महाराष्ट्रात येतो. इथे त्याला राधासारखी स्वयंपाक शिकवणारी गुरू मिळते आणि तिथून त्याच्या कठीण प्रवासाला सुरुवात होते. कठीण या अर्थाने की राधा ही साधीसरळपणे शिकवणारी गुरू नाही. ती आदित्यला भाजी निवडण्यापासून छोटी छोटी कामं करायला सांगते. ती नुसती त्याच्यावर डाफरत असते. त्यामुळे तिच्याकडून आपल्याला जे शिकायचंय ते मिळवताना आदित्यला बरीच मेहनत करावी लागते. सोनालीबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे. त्यामुळे आदित्यची भूमिका तितकी सोपी नव्हती पण सोनाली आणि सचिन या दोघांनीही मत्रीपूर्ण वातावरण ठेवल्यामुळे आदित्यचं पात्र साकारताना दडपण आलं नाही.

मराठी चित्रपटांची व्याप्ती आणि दर्जा ज्या पद्धतीने वाढतोय, तशी इथली कलाकार मंडळीदेखील कात टाकतायेत. एखाद्या चित्रपटात दिसल्याने वर्षभरात आपल्या वाटय़ाला अजून चांगल्या भूमिका येतील का, याचा हिशेब आता कलाकार करू लागले आहेत. शिवाय वर्षभराचे गणित करून कलाकार मंडळी सर्व माध्यमे चाचपण्याचा प्रयत्न करत आहेत. टीव्ही, रंगभूमी आणि चित्रपट तिन्ही माध्यमांमधून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं हे त्यांना समजून चुकलं आहे. पूर्वी आपण खूप लोकांसमोर आलो तर त्याचा उलट परिणाम आपल्यावर होईल, असे विचार होते. आता ते तसे उरलेले नाहीत. अर्थात, आपण कुठल्या माध्यमावर कशा पद्धतीने लोकांसमोर येतोय हेही जपण्याचा कलाकार प्रयत्न करतात. त्यामुळे हा चांगला बदल स्वीकारण्याचा प्रयत्न मी देखील केला आहे. शिवाय सद्य:स्थितीत एखादे काम स्वीकारताना मी माझ्याकडे असणाऱ्या पैशांच्या संचयाचाही विचार करतो. आपण कोणत्या माध्यमातून दिसावे यापेक्षाही कोणत्या माध्यमातून पैसे जास्त मिळतील आणि अभिनयाचा दर्जाही वाढविता येईल याचा सुवर्णमध्य हल्ली प्रत्येक कलाकाराला गाठावा लागतो. मीही माझ्या भूमिकांमधून ते करण्याचा प्रयत्न करतो आहे.    – सिद्धार्थ चांदेकर, अभिनेता

 

‘मराठी प्रेक्षक आशयघन हेच मनोरंजनात्मक’

मराठी प्रेक्षक सुजाण आहे, कारण आपल्याकडे आशयघन हेच मनोरंजनात्मक मानले जाते. आशयघन चित्रपट रंजक पद्धतीने मांडल्यावर नक्कीच प्रेक्षकांना त्याची भुरळ पडते. प्रत्येक चित्रपटाला आपले व्यक्तिमत्त्व असते. तसेच प्रेक्षक त्यामध्ये आपल्यासाठी काय खास आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीने चित्रपटाची प्रसिद्धी ही निरनिराळ्या पद्धती वापरूनच करावी लागते.  – मंगेश कुलकर्णी, व्यवसायप्रमुख – झी स्टुडिओ

 

संकलन  : अक्षय मांडवकर