पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई केल्यानंतर ‘गली बॉय’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘गली बॉय’ने दोन दिवसांत एकूण ३२.५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती दिली आहे.

सुट्टीचा दिवस नसतानाही झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे कमाई झाली नाही. आठवड्याअखेर चित्रपटाच्या कमाईत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चांगली कमाई झाल्यास हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा आकडा गाठू शकेल. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटात रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री सर्वाधिक लक्ष वेधून घेत असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं.

 

Story img Loader