दिग्दर्शक संजय जाधवच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला ‘गुरु’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनाने सिनेमात एक वेगळीच लकाकी येते. त्याच्या दिग्दर्शनाची आणखी एक छटा गुरु सिनेमात पाहायला मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपर हिरो अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे. त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचाविणाऱ्या धमाकेदार टायटल साँग लाँच करण्यात आलं. अंधेरी येथील इरॉस इंटरनॅशनलच्या प्रीविव्ह्यू थिएटरमध्ये या गाण्याचा पहिला वहिला लूक सिनेमातील कलाकारांनी एकत्र अनुभवला. यावेळी उमेश जाधव यांच्या तालावर आणि अमितराज यांच्या संगीतावर अंकुश चौधरी, संजय जाधव तसेच अमितराज आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने ताल धरला. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे गुरूच्या सगळ्या टीमने तसेच उपस्थित कलाकारांनीही ‘गुरु’ स्टाईलचे रीफ्लेक्टर गॉगल्स लावले होते. आणि त्यामुळेच संपूर्ण वातावरण ‘गुरुमय’ झालं होतं. या धमाकेदार सॉंग लाँचनंतर गुरु सिनेमाच्या ऑफिशियल पोस्टरचे लाँच अंकुश आणि संजय जाधवच्या हस्ते करण्यात आले.
गीतकार सचिन पाठकने (यो) लिहिलेल्या “हुं बडे जिगरवाला थोडासा हू चालू, जेंटलमन में हू सबका गुरु!”… या गाण्याला गायक आदर्श शिंदेने तुफान आवाज दिला आहे. तर यास अमितराजचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे. अंकुशवर चित्रित झालेल्या या गाण्या बद्दल त्याला यावेळी विचारले असता, तो म्हणाला की, “हिरोच्या एन्ट्रीचं सॉंग करायला मिळालं याचा आनंद मला वाटतो, कलरफुल गुरु तुम्हाला या गाण्यातून पाहायला मिळेल. हर्षदा खानविलकर आणि कश्मिरा यांनी मिळून गुरुच्या लूकवर मेहनत घेतली आहे. लोकांना अफोर्ड होणारी स्टाईल या सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे. गुरूची खासियत म्हणजे एक नवी स्टाईल स्टेटमेंट या सिनेमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा खूप छान होता, यानंतर अनेक सिनेमे त्यांच्यासोबत करायची इच्छा आहे.” तर संजय जाधवने सांगितले की, “माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं कि, हिरोची एक तरी फिल्म आपण करावी, ज्यात फक्त आणि फक्त हिरोलाच जास्त महत्व मिळायला हवं. त्यानुसार स्क्रिप्टवरती काम सुरु केलं आणि त्यातूनच गुरुची निर्मिती झाली. गुरूचा टायटल साँग बनवताना हिरोला फोकस ठेवण अपेक्षित होतं, त्यामुळे या उद्देशानेच मी अमितराजला गाण कंपोझ करायला सांगितलं. अमितराज याने अपेक्षेप्रमाणे खूपच छान गाणं तयार केलं आहे.” गुरु सिनेमाच्या या टायटल साँगच्या टीझरला सोशल साईटवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेमातील या गाण्याला प्रेक्षकांकडून नक्कीच पसंती मिळेल अशी आशा गुरु सिनेमाच्या टीमने व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2015 रोजी प्रकाशित
‘गुरु’मध्ये फक्त हिरोलाच महत्त्व- संजय जाधव
२२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 22-12-2015 at 16:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru marathi movie poster launch