प्रेम… आयुष्यात आलेला एक हळुवार क्षण…  प्रेमात असलेल्या ‘त्याला’ आणि ‘तिला’ जोडणारा रेशमी बंध… हा बंध त्यांच्याही नकळत कधी जुळून येतो हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळी गोष्ट असते. प्रेमाच्या लाटेवर स्वार झालेल्या प्रत्येकाचेच स्वतंत्र अनुभवविश्व पहायला मिळते. अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट घेऊन दिग्दर्शक गिरीश मोहिते ‘गुरु पौर्णिमा’ हा मराठी चित्रपट घेऊन येताहेत. ‘श्रीहित प्रॉडक्शन’ निर्मिती संस्थेच्या मेघना मनोज काकुलो यांनी ‘गुरु पौर्णिमा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘तो’ आणि ‘ती’ यातही आहे, पण त्यांची लवस्टोरी थोडी जगावेगळी आहे. एव्हाना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल, ते लक्षात घेऊनच सिनेमाचा ‘फर्स्ट लूक’ चित्रपटाच्या कलाकार तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.

येत्या १२ सप्टेंबरला ‘गुरु पौर्णिमा’ सिनेमा प्रदर्शित होणार असून उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकरची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना यात पहाता येणार आहे. आजवर गंभीर आणि सामाजिक आशय असणाऱ्या सिनेमात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे सशक्त अभिनेते उपेंद्र लिमये प्रथमच ‘गुरु पौर्णिमा’मध्ये प्रेमात पडलेल्या नायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांना तितकीच महत्वपूर्ण साथ अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली आहे. लवस्टोरीवर आधारित सिनेमा असल्याने याचे संगीत तरुणाईला ताल धरायला लावणारं असून वैभव जोशी, अनुराधा राजाध्यक्ष लिखीत यातील गीतांना युवा संगीतकार अविनाश- विश्वजीत या जोडीने संगीत दिलंय. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गायिका बेला शेंडे व गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत.

उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे या कलाकारांनी भूमिका साकारल्यात. या सिनेमाचे बरेचसे शुटींग गोव्यात करण्यात आले असून यानिमित्ताने गोव्याचे एक वेगळे दर्शन प्रेक्षकांना घडेल.

Story img Loader