मराठी चित्रपटाच्या अनुभवी दिग्दर्शकाने ‘गुरूपौर्णिमा’ या चित्रपटाद्वारे प्रथमच प्रेमकथा हाताळली आहे. गुरू आणि पौर्णिमा या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. ताज्या ‘लूक’चा, नवीन चित्रीकरणस्थळी चित्रित झालेला चित्रपट आहे. उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर आणि सुलभा आर्य या तीन प्रमुख कलावंतांच्या उत्तम अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासारखा असला तरी प्रेमकथेत कुठेही अनपेक्षित वळण न आणता आजच्या काळात सरधोपट पद्धतीने चित्रपट प्रेक्षकांसमोर उलगडत जात असल्यामुळे खूप काही या चित्रपटात घडतच नाही. कलावंत मात्र उत्तम घेतल्यामुळे तसेच सई ताम्हणकर – उपेंद्र लिमये ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहे हेच काय ते वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
आघाडीचा जाहिरातपटांचा दिग्दर्शक असलेला गुरू आता सेलिब्रिटी आहे. पण कॉलेजच्या दिवसांत त्याला लघुपट करताना भेटलेली पौर्णिमाच्या आठवणीत रमून गेला आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी तो २० वर्षे उलटून गेली तरी कॉलेजमध्ये आवर्जून जातो. तिथे पौर्णिमा व अन्य चमूसमवेत लघुपटासाठी केलेल्या तालमी, एकत्र केलेली धमाल, त्यातून पौर्णिमा व गुरू यांच्यात निर्माण झालेले प्रेम, लग्न, आकांक्षा या मुलीचा जन्म असे सगळे आता गुरूसाठी फक्त निसटून गेलेले क्षण राहिलेत. पौर्णिमाला कॉलेजपासून असलेली अभिनयाची आवड गुरूच्या मार्गदर्शनामुळे पूर्ण होते, ती अभिनेत्री बनते. वयामध्ये खूप अंतर असलेल्या गुरू व पौर्णिमा यांचे दरम्यानच्या काळात लग्न होते. महत्त्वाकांक्षी अभिनेत्री आणि महत्त्वाकांक्षी दिग्दर्शक अशी दोघांची करिअरची वाटचाल सुरू होते, यशस्वी होते. नंतर आकांक्षा या मुलीचा जन्म होतो आणि काही कारणाने गुरू व पौर्णिमा विभक्त होतात.
गोव्यातील एका क्लबच्या उत्तम लोकेशनवर चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचा ‘लूक’ ताजातवाना आहे. गुरूच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये आणि पौर्णिमाच्या भूमिकेतील सई ताम्हणकर यांच्याच बरोबरीने गुरूच्या आईच्या भूमिकेतील सुलभा आर्य यांनीही आपापले काम चोख केले आहे.
फ्लॅशबॅकचा काळ आणि वीस वर्षांनंतरच्या आजच्या काळात गुरू व पौर्णिमा यांची कन्या आकांक्षा कॉलेजमध्ये गेल्याचे दाखविले आहे.
म्आघाडीची अभिनेत्री बनलेली परंतु आता मध्यमवयाकडे झुकलेली पौर्णिमा दाखविताना दिग्दर्शकाने ती पोक्त दिसावी म्हणून केलेली रंगभूषा समजून घेणे शक्य आहे. परंतु वय वाढलेली अभिनेत्री दाखविताना ती उदास चेहऱ्याची सतत दाखविण्यामागे काय हेतू असावा हे समजत नाही. प्रेमकथेत आवश्यक असलेली वळणे इथे येत नाहीत. त्यामुळे कलावंतांचा उत्तम अभिनय वगळला तर चित्रपट फारसे काही प्रेक्षकापर्यंत पोहोचविण्यात कमी पडतो.
श्रीहित प्रॉडक्शन्स
गुरू पौर्णिमा
निर्माती – मेघना काकूलो
दिग्दर्शक – गिरीश मोहिते
कथा – स्वप्निल गांगुर्डे
पटकथा-संवाद – जितेंद्र देसाई
संगीत – अविनाश – विश्वजीत
छायालेखन- संतोष शिंदे
संकलन – नीलेश गावंड
कलावंत – सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये, सुलभा आर्य, विधिता काळे, राजीव हेडे, सुशांत नायक.