जीवन जगत असताना अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजांव्यतिरिक्त जर मानवाला कोणत्या घटकाची आवश्यकता असेल. तर ते म्हणजे पाणी. आपल्या जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे पाणी म्हणजे आपलं एकप्रकारे जीवनच आहे. याच पाण्याची वैज्ञानिक परिभाषा म्हणजे H2O. पाण्याला विज्ञानाच्या भाषेत H2O असं म्हणतात, याच नावावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
H2O असं हटके आणि वेगळं नाव असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कोरडी जमिनी आणि तिला गेलेले तडे दिसून येत आहेत. त्यासोबतच जमिनीवर पाण्याचे काही थेंबही सांडल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा चित्रपट दुष्काळावर भाष्य करणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, दुष्काळासोबतच हा चित्रपट आणखी एका नव्या विषयावर भाष्य करणार आहे. कारण प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दुष्काळ परिस्थिती दाखविण्यासोबतच दोन व्यक्तींचे पायही दिसून येत आहेत. यामध्ये संबंधित व्यक्तींपैकी एकाच्या पायात चप्पल तर दुसऱ्या व्यक्तीच्या पायात बूट दिसून येत आहे.
कहाणी थेंबाची अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती सुनिल म. झवर यांनी केली आहे. या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र या भूमिकांवरील पडदाही लवकरच दूर सारण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. हा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.