विशाल भारद्वाज यांचा शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित ‘हैदर’ हा तिसरा चित्रपट आहे. मानवी भावभावनांचे नाटय़ उलगडून दाखविण्यासाठी या चित्रपटात काश्मीरमधील १९९५ सालची परिस्थिती, दहशतवाद फोफावलेला असतानाचा काळ दाखविला आहे. काश्मीरमधील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर
हैदर अलिगढहून आपल्या गावी काश्मीरमध्ये परततो, तेव्हा त्याचे वडील हरवलेले असतात. डॉक्टरी पेशा करीत असताना एका जखमी अतिरेक्यावर शस्त्रक्रिया करताना ते पकडले जातात आणि नंतर गायब होतात. हैदर आपल्या गावी पोहोचल्यावर सर्वात आधी बालपणीचे घर पाहायला जातो आणि घराचे भग्नावशेष पाहून मनापासून हादरतो. काश्मीरमध्ये परततानाच लष्कराकडून संशयाने काश्मिरी लोकांकडे पाहिले जाते याची झलक त्याला अनुभवायला मिळते. त्यामुळेही अस्वस्थ, उद्विग्न झालेल्या हैदरला त्याची प्रेयसी अर्शिया सांभाळते. घराचे भग्नावशेष पाहून हैदर आपल्या आजोबांच्या परंपरागत घरी जातो. तिथे आई-काका यांचे नाचगाणे बघतो आणि वडील गायब होऊन काहीच दिवस झाले तरी आईला त्याचे काहीच वाटत नाही म्हणून हैदर चपापतो. त्याला काका-आई यांच्यात प्रेमसंबंध असल्याची शंका येते. काश्मीरमधील धुमसती परिस्थिती, अतिरेकी आणि लष्कर यांचा संघर्ष, त्याचे समाजावर होत असलेले परिणाम आणि हरवलेल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हैदरचे जंगजंग पछाडणे यातून गहिरे नाटय़ उभे करण्याबरोबरच भावनिक आंदोलनांचे पदर उलगडणे, लष्कर-अतिरेकी-अलगतावादी गट यांची कट-कारस्थाने दाखविली आहेत. काश्मिरातील लोकांचा ‘वापर’ आपल्या कटकारस्थानांसाठी लष्कराने कसा केला याची झलक दाखविताना दिग्दर्शकाने सूचक भाष्य केले आहे.
वडिलांच्या शोधार्थ भटकणारा हैदर अनेकदा अगतिक होतो. भोवतालची गढूळलेली परिस्थिती, त्याही स्थितीत लष्कर-पोलीस यांच्या मदतीने मौजमजा करण्यात मश्गूल वृत्तीची माणसे, दाल लेकचे दर्शन, बर्फ पडत असताना प्रेम करणारे हैदर-अर्शिया, प्रत्येक चित्रचौकटीला दिग्दर्शक-छायालेखकाने दिलेली गडद झाक यातून काश्मीरमधील त्या काळची परिस्थिती अंगावर येते. संपूर्ण चित्रपटात प्रत्येक वेळी प्रेक्षकाला काश्मीरवरील दहशतवादाच्या छायेची, भीतीने दडपून गेलेल्या माणसांची वेदना अधिक गहिरी करीत जाते.
शाहीद कपूरने हैदर उत्तम साकारला आहे. प्रामाणिकपणे त्याने दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे भूमिका केली आहे, असे म्हणावे लागेल. त्याचा सर्वोत्तम अभिनय असलेला हा चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शकाचे नेहमीचे कलावंत अर्थात तब्बू आणि इरफान खान यांनीही अनुक्रमे गझला आणि रूहदान या भूमिकांमध्ये जान ओतली आहे. परंतु, मकबूल चित्रपटात तब्बूने अधिक सरस अभिनय केला होता. त्या तुलनेत गझला ही व्यक्तिरेखा साकारण्यात ती कमी पडली हे जाणवते. अखंड चित्रपटभर दहशतवाद, लष्कराची भीती याचे सावट प्रेक्षकाला जाणवत राहील अशा खुबीने पटकथालेखन करण्यात आले आहे. संगीत-गाणी, काश्मिरी घरांमधील अंधार, बर्फाळलेली रात्र या सर्वाद्वारे निराशा, हतबलता, अपरिहार्यता, मानवी दु:ख या भावनांचे दर्शन घडविले आहे. हैदरची प्रेयसी असलेली अर्शिया ही काश्मिरी तरुणीची व्यक्तिरेखा श्रद्धा कपूरने चांगली साकारली आहे. खुर्रम काका या व्यक्तिरेखेद्वारे के के मेननने कपटीपणाचा अभिनय उत्तम केला आहे. अर्शियाचे वडील आणि पोलीस अधिकारी व्यक्तिरेखेत अभिनेता ललित परीमू हेही भाव खाऊन गेले आहेत. सिनेमाच्या सर्व अंगांची उत्तम भट्टी जमलेले गहिरे नाटय़ पडद्यावर साकारले आहे.
हैदर
निर्माते – सिद्धार्थ रॉय कपूर, विशाल भारद्वाज
संगीत व दिग्दर्शन – विशाल भारद्वाज
लेखन – विशाल भारद्वाज, बशरत पीर
छायालेखन – पंकज कुमार
संकलन – आरिफ शेख
गीते – गुलजार, फैज अहमद फैज
कलावंत – शाहीद कपूर, तब्बू, के के मेनन, श्रद्धा कपूर, कुलभूषण खरबंदा, इरफान खान, नरेंद्र झा, ललित परीमू, आशीष विद्यार्थी, आमिर बशीर, सुमीत कौल, रजत भगत, अश्वत्थ भट्ट, मुझामिल भवानी.
गहिरे नाटय़
विशाल भारद्वाज यांचा शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित ‘हैदर’ हा तिसरा चित्रपट आहे. मानवी भावभावनांचे नाटय़ उलगडून दाखविण्यासाठी या चित्रपटात काश्मीरमधील १९९५ सालची परिस्थिती, दहशतवाद फोफावलेला असतानाचा काळ दाखविला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-10-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haider review