कान फेस्टिव्हल, पुणे महोत्सव, गोवा महोत्सव यांसारख्या विविध महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा तसेच संस्कृती कलादर्पण व राज्य पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेला हलाल सिनेमा आता ‘इफ्फी’तही झळकणार आहे. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत ‘हलाल’ या सिनेमाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट पाठविण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. यंदा याच धर्तीवर गोवा येथे होणाऱ्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० चित्रपट निवडण्यात आले आहेत.
रूढी परंपरांच्या जोखाड्यात अडकलेल्या मानवी वेदनेच्या कथेला दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी रुपेरी पडद्यावर साकारत मानवी मूल्यांचा व जगण्याचा वेध परखडपणे घेतला आहे. राजन खान यांच्या कथेवर बेतलेला हलाल चित्रपट मुस्लिम समाजातील रितीरिवाज व विवाहसंस्थेवर भाष्य करतो. हलालला मिळत असलेला प्रतिसाद व विविध  पुरस्कारांची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत ‘इफ्फी’त ही हलाल आपला ठसा उमटवेल असा विश्वास निर्माते अमोल कागणे यांनी व्यक्त केला.
‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हलाल सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा