|| रवींद्र पाथरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेली चारशे वर्षे शेक्सपिअरची नाटकं जगभरातील रंगकर्मीनाच नव्हे, तर एकूणच कलावंत जमातीला कायम खुणावत आली आहेत. त्याच्या नाटकांची अगणित भाषांतरं, रूपांतरं, माध्यमांतरं आजवर झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. किंबहुना, ‘शेक्सपिअरने असा एकही विषय अस्पर्श ठेवलेला नाही, की ज्यावर त्याच्या नंतरच्या काळातले लेखक स्वतंत्र कलाकृती प्रसवू शकतील,’ असं अनेकदा गमतीत म्हटलं जातं. ‘महाभारत’ हे भारतीय महाकाव्य आणि शेक्सपिअरचं साहित्य यांनी मानवी जीवनाचे वैविध्यपूर्ण पैलू आपल्या कवेत घेतले आहेत. माणसाचं जगणं, त्याचे गुणदोष, वृत्ती-प्रवृत्ती, परिस्थितीवश बदलणारी त्याची रूपं, भव्योदात्त वृत्ती, त्याचं क्षुद्रपण, अथांगता, नैतिक-अनैतिक वर्तन, त्यातून निर्माण होणारे पेच आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने योजलेले मार्ग आणि त्याची परिणती.. अशा अगणित गोष्टी या वाङ्मयकृतींतून मांडल्या आहेत. ज्यांचं अर्थनिर्णयन कितीही वेळा आणि कोणत्याही परिप्रेक्ष्यातून (पस्र्पेक्टिव्ह) केलं तरी दशांगुळे ते उरतंच. चार शतकांचा दीर्घकाळ लोटूनही, मानवी जीवनात ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानानं आमूलाग्र क्रांती करूनही या कलाकृती त्यावर मात करून कालातीत असल्याचं सिद्ध झालं आहे.

आधुनिक मराठी रंगभूमीनेही प्रारंभापासूनच शेक्सपिअरशी सलगी केली आहे. शेक्सपिअरच्या नाटकांची भाषांतरं, रूपांतरं आणि निरनिराळ्या आवृत्त्यांनी (व्हर्शन्स) मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. नाटककारांपासून साहित्यिकांपर्यंत आणि नाटय़कर्मीपासून चित्रपटकर्मीपर्यंत सर्वानाच शेक्सपिअरने भुरळ घातलेली आहे. त्याच्या नाटकांचं शिवधनुष्य पेलण्याच्या ऊर्मीतून अनेक लेखकांनी त्यांच्या भाषांतर-रूपांतराचं आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीपणे पेललंही. अनेक नाटय़कर्मीनी शेक्सपिअरची नाटकं सादर करून स्वत:ला कसाला लावून पाहिलं. या पंक्तीत आता जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित ‘हॅम्लेट’ या भव्य महानाटय़ाची भर पडली आहे. ‘मराठी रंगभूमीला भव्यदिव्य स्वप्नं पडत नाहीत,’ असा आक्षेप अनेकदा घेतला जातो. (अर्थात त्याला व्यावहारिक कारणं आहेत. ज्यांची चर्चा इथं अप्रस्तुत ठरावी.) त्याला ही नाटय़कृती हे ठोस उत्तर आहे. चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘शिवसंभव’ या भव्य महानाटय़ाची निर्मिती करून असा ‘प्रयोग’ एकेकाळी केला होता. अलीकडच्या काळात ‘आविष्कार’ व ‘जिगीषा-अष्टविनायक’ या संस्थांनी भारतीय रंगभूमीवरील अभिजात नाटय़त्रयी म्हणून मानल्या जाणाऱ्या ‘वाडा..’ त्रयीचा नऊ तासांचा सलग ‘प्रयोग’ सादर करून असा प्रत्यय पुन्हा रसिकांना दिला होता. त्या यशानंतर आता शेक्सपिअरकृत ‘हॅम्लेट’ भव्यदिव्य रूपात पेश करून पाश्चात्य अभिजात कलाकृतीला गवसणी घालण्याचं कर्तब दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दाखवलं आहे. या तिन्ही वेगळ्या ‘प्रयोगा’शी चंद्रकांत कुलकर्णी यांचं निगडित असणं, हा खचितच योगायोग नव्हे. नित्य नव्या आव्हानांशी दोन हात करण्याच्या वृत्तीतूनच त्यांनी हा घाट घातला आहे. त्यासाठी त्यांनी नाना जोगलिखित ‘हॅम्लेट’चा आधार घेतला आहे. मात्र, कालानुरूप त्याची संपादित रंगावृत्ती करण्याची निकड जाणवल्यानं ते काम प्रशांत दळवी-अनिल देशमुख या लेखकद्वयीनं केलं आहे. शेक्सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. मिलिंद मालशे यांनी याकामी त्यांना संशोधनात्मक साहाय्य केलं आहे.

‘हॅम्लेट’ हे एक सूडनाटय़ आहे. डेन्मार्कचा राजा हॅम्लेट याचा खून त्याचाच सख्खा भाऊ क्लॉडियस कपट-कारस्थानाने करतो आणि हॅम्लेटची पत्नी गर्ट्रय़ुड हिच्याशी लग्न करून स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतो. हॅम्लेटचा पुत्र युवराज हॅम्लेट शिक्षणाकरता तेव्हा विद्यापीठात असतो. वडिलांच्या आकस्मिक निधनाने तो शोकाकुल होतो. त्याचवेळी आपल्या आईनं वडिलांच्या मृत्यूपश्चात लगोलग आपल्या काकाशीच लग्न करून त्याची राणी होणं त्याला भलतंच खटकतं. त्यामुळेही अंतर्यामी तो खदखदत असतो. तशात त्याच्या वडलांचं भूत त्याला आपला खून झाल्याचं आणि तोही आपल्या सख्ख्या भावानंच केल्याचं सांगतं आणि त्याचा सूड घेण्यास सांगतं. भूतखेतादी गोष्टींवर विश्वास नसलेल्या युवराज हॅम्लेटचा आधी या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. पण तरीही तो याचा शहानिशा करायचं ठरवतो. त्यासाठी वेडय़ाचं सोंग घेतो. राजाचा एकनिष्ठ सेवक पोलोनियस याच्या मुलीवर- ऑफेलियावर हॅम्लेटचं प्रेम असतं. तीही त्याच्या प्रेमात असते. परंतु आईच्या व्यभिचाराने बिथरलेल्या हॅम्लेटला ऑफेलियाच्या प्रेमातही छळकपटाचा संशय येतो. तो तिला दूर करू पाहतो. पोलोनियसलाही त्यांचं प्रेम पसंत नसतं. तो मुलीला हॅम्लेटपासून दूर राहण्याचा, त्याच्याबरोबरचे प्रेमसंबंध संपवण्याचा सल्ला देतो. त्यानुसार ऑफेलिया हॅम्लेटशी असलेले संबंध तोडते.

इकडे हॅम्लेटच्या वेडाचाराने राजा क्लॉडियस चिंतित होतो. त्याचं हे वेड खरं की खोटं- त्याला समजत नाही. युवराज हॅम्लेट आपण त्याच्या वडलांच्या केलेल्या खुनाचा सूड घेईल अशी भीती त्याला ग्रासून असते. हॅम्लेटची आई- राणी गर्ट्रय़ूड हीसुद्धा धास्तावलेली असते. क्लॉडियस पोलोनियसवर हॅम्लेटच्या वेडाचा शहानिशा करण्याचं काम सोपवतो. ऑफेलियाबरोबरचे प्रेमसंबंध तुटल्याने हॅम्लेटला वेड लागल्याचं पोलोनियस राजाला सांगतो. पण त्यावर त्याचा विश्वास बसत नाही. तो हॅम्लेटच्या मित्रांनाच मग हेर बनवून त्याच्याकडून खरं काय ते काढून घ्यायला पाठवतो. पण हॅम्लेट त्यांनाही कात्रजचा घाट दाखवतो.

दुसरीकडे हॅम्लेटलाही वडलांच्या भूताने सांगितलेली आपल्या खुनाची कहाणी खरी की खोटी, याची खातरजमा करायची असते. तो एका नाटक कंपनीतील नटांना सख्ख्या भावानेच भावाचा खून करून त्याचं राज्य राणीसह बळकावल्याचं कथानक असलेलं नाटक दरबारात सादर करायला सांगतो; जेणेकरून क्लॉडियसने खरोखरच आपल्या वडलांचा खून केला असल्यास नाटक पाहताना त्याच्या चेहऱ्यावरील अपराधीभाव टिपता येतील आणि वडलांच्या भूताने सांगितलेल्या गोष्टीवर शिक्कामोर्तबही होईल. त्याप्रमाणे नाटक पाहताना क्लॉडियस अस्वस्थ होतो आणि नाटक तत्काळ थांबवण्याचा आदेश देतो. हॅम्लेटच्या मनातल्या किंतुचं निराकरण होतं. क्लॉडियसचा बदला घेण्यासाठी तो संधीची वाट बघू लागतो..

तशी संधी त्याला मिळते का? की क्लॉडियसच त्याच्यावर पलटवार करतो? वगैरे गोष्टी ‘हॅम्लेट’च्या जाणत्या रसिकांना माहीत आहेतच.

रंगावृत्ती करताना प्रशांत दळवी आणि अनिल देशमुख यांनी नाना जोग यांची संहिता वर्तमानाशी सन्मुख करण्याकरता त्यातील शैलीदारपणाची मात्रा किंचित कमी केली आहे. अर्थात शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा मूळ गाभा आणि शैली यांना धक्का न लावता त्याचा प्रत्यय येईल, पण नाटक बोजड होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी ही रंगावृत्ती साकारली आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी ‘हॅम्लेट’ची ‘लार्जर दॅन लाइफ’ भव्यता प्रतीत होईल असं नेपथ्य केलं आहे. किल्ल्यातील निरनिराळ्या जागा तसंच मोजक्या प्रॉपर्टीच्या साहाय्याने त्यांनी विविध नाटय़स्थळे निर्माण केली आहेत. त्याद्वारे प्रयोगास दृश्यात्मकता प्राप्त करून दिली आहे. प्रकाशयोजनेतील रंगांच्या पोतांतून दिवस-रात्रीचे प्रहर, त्यासमयीची वातावरणनिर्मिती आणि मूड्स त्यांनी समूर्त केले आहेत. पात्रांच्या पाश्चात्य वेशभूषेची जबाबदारीही त्यांनी यथार्थपणे निभावली आहे. ‘हॅम्लेट’च्या अस्सल सादरीकरणात मुळ्ये यांच्या त्रिविध कामगिरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  राहुल रानडे यांच्या संगीताच्या बाबतीत हेच म्हणता येईल. पाश्चात्य वाद्यं आणि सुरावटींचा त्यांनी केलेला चपखल वापर निर्मितीमूल्यांत भर घालतो. ऑफेलियाच्या दफनविधीच्या वेळी धीरगंभीर, शोकाकुल वातावरणनिर्मितीत पाश्र्वसंगीताचा मोलाचा वाटा आहे. उल्लेश खंदारे यांच्या रंगभूषेनं पात्रांना स्वत:चं असं विशिष्ट व्यक्तिमत्त्व दिलं आहे.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपली सगळी प्रतिभा आणि रंगभूमीवरील प्रदीर्घ अनुभव ‘हॅम्लेट’मध्ये पणास लावला आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, वेशभूषा, केशभूषा, वातावरणनिर्मिती, व्यक्तिरेखाटन आणि सादरीकरण अशा सर्वच अंगांत अस्सलता यावी यासाठी त्यांनी तपशिलांवर सखोल काम केल्याचं सतत जाणवतं. पात्रांची मानसिकता, भावाभिव्यक्ती, त्यांचा रंगमंचावरील वावर, हालचाली, आकृतिबंध, संवादफेक अशा सर्वच बाबींत त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आहे. हॅम्लेट आणि लेआर्टिस यांच्यातील तलवारयुद्ध खरं वाटावं यासाठीही विशेष कष्ट घेतले आहेत. आपण एखाद्या पाश्चात्य नाटक मंडळीचा प्रयोग पाहतो आहोत असं ‘हॅम्लेट’ बघताना वाटत राहतं. पोलोनियसच्या कथनी व करणीतील विरोधाभास त्याच्या अखंड बडबडीतून त्यांनी अधोरेखित केला आहे. हॅम्लेटच्या मनात सतत सुरू असलेलं प्रलंयकारी द्वंद्व त्याच्या अस्थिर हालचाली, स्वत:शीच बडबडणं यातून त्यांनी दर्शविलं आहे. परंतु होरॅशिओला विश्वासात घेतानाचा त्याचा वेगळा स्वर त्याच्या वेडाचारामागचं शहाणपण ठसवतं. राणी गरट्रय़ूडचं धास्तावलेपण तिच्या व्यवहारांत दिसत राहील याची दक्षता दिग्दर्शकानं घेतली आहे. हॅम्लेटला आपल्या बापाच्या खुनाचं वास्तव कळून तो आपला सूड घेईल, या भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या क्लॉडियसची दहशतग्रस्तताही प्रयोगभर जाणवत राहते.

‘हॅम्लेट’च्या यशात कलावंतांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. हॅम्लेट साकारणाऱ्या सुमीत राघवन यांना त्यांच्या कारकीर्दीतील अत्यंत आव्हानात्मक भूमिका इथे मिळाली आहे आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं आहे. हॅम्लेटची द्विधावस्था, आईनंच आपल्या वडलांच्या खुन्याशी केलेल्या पुनर्विवाहामुळे त्याचं हताश, हतबल व क्षोभित होणं, वडलांच्या भूतानं आपल्या खुनाला वाचा फोडल्यानं त्याचं सूडानं पेटून उठणं, आईच्या व्यभिचारामुळे प्रेयसी ऑफेलिया हिच्याशीही बदललेलं त्याचं वर्तन, आईबरोबरच्या ‘संवादा’त व्यक्त होणारा त्याचा उद्वेग, शोकसंताप आणि अखेरीस लेआर्टिसशी तलवारयुद्ध करताना त्याचं त्वेषानं तुटून पडणं.. अशा सर्वच प्रसंगांत सुमीत राघवन यांचा कस लागला आहे. आणि त्यात ते शंभर टक्के कसोटीस उतरले आहेत. क्लॉडियसची बेमुर्वतखोर वृत्ती, आपली राक्षसी सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्याची तयारी, हॅम्लेट आपल्या वडलांच्या खुनाचा सूड घेईल या भीतीमुळे त्याच्या वागण्या-बोलण्यात आलेली संशयग्रस्तता या संमिश्र भावभावनांचं प्रकटन तुषार दळवी यांनी उत्तम केलं आहे. मुग्धा गोडबोलेंची राणी गरट्रय़ुड कायम भयभीत, चिंताग्रस्त जिणं जगते. त्याचं स्वच्छ प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर व वावरण्यातून उमटतं. पोलोनियसच्या भूमिकेत सुनील तावडे फिट्ट बसले आहेत. मनवा नाईकची ऑफेलिया सहजसुंदर. ऑफेलियाचं असणं, दिसणं, तसंच डेन्मार्कच्या राजघराण्यातील संघर्षांत तिचं हकनाक बळी जाणं- तिला सहानुभूती मिळवून देतं. भूषण प्रधान (लेआर्टिस) आणि आशीष कुलकर्णी (होरॅशिओ) यांनी आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. रणजीत जोग, ओंकार कुलकर्णी, कुणाल वाईकर, आनंद पाटील, ओंकार गोखले, नितीन भजन, सौरभ काळे, तुषार खेडेकर, मयुर निकम, अरुण वाठ, व्हॅलेंटाईन फर्नाडिस अशा सर्वानीच चोख कामं केली आहेत. ‘हॅम्लेट’चं मराठी रंगभूमीला पडलेलं हे भव्यदिव्य स्वप्न रसिकांनी आवर्जून अनुभवायला हवं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamlet play by william shakespeare