बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. आजही त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. आज आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या अशा एका चाहत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याने चक्क अमिताभ यांचे मंदिरच उभारले आहे. संजय पाटोदिया हा अमिताभ यांचा कट्टर चाहता आहे. त्याचे स्वतःचे एक गॅरेज असून त्याने गॅरेजच्या आत अमिताभ यांचे मंदिर बनवले आहे. ते सकाळ- संध्याकाळ अमिताभ यांच्या मुर्तीची पूजा करतात.
संजयसोबत त्यांचे घरातलेही बिग बींचे चाहते आहेत. संजय यांचा मुलगा अगस्त्य शाळेत आपल्या मित्रांसोबत फक्त अमिताभ यांच्याच गप्पा मारतो. त्याच्या या गप्पांची तक्रार करण्यासाठी शाळेकडून संजय यांना बोलावण्यात आले होते. पण स्वतः संजय बच्चन यांचा कट्टर चाहता असल्यामुळे ते आपल्या मुलाला तरी काय सांगणार ना?
संजय हा मंदिरात अमिताभ आरती आणि अमिताभ चालीसाचे पठण करतो. एवढेच नाही तर तो आपल्या गळ्यात अमिताभ यांचा फोटो असलेले सोन्याचे लॉकेटही वापरतो. याशिवाय संजय ‘ऑल बंगाल अमिताभ बच्चन फॅन्स असोसिएशन’चा (ABABF) सेक्रेटरीही आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही असोसिएशन अनेक कार्यक्रमही करत असते.
‘हे हरिवंश ज्ञान गुण सागर/आपसे हुए एक अवतार उजागर/ हरिपुत्र अतुलित बलधामा/ तेजीपुत्र अमिताभ है नामा’ असे अमिताभ चालिसाचे बोल आहेत. ही चालीसा संजय सकाळ- संध्याकाळ रोज वाचतो. तसेच मंदिराच्या भिंतीवर ‘जय श्री अमिताभ’ आणि ‘हर हर अमिताभ’ असे लिहिले आहे. जोपर्यंत या मंदिरात अमिताभ यांची मूर्ती नव्हती तोपर्यंत इथे ‘तुफान’ आणि ‘अग्निपथ’ या सिनेमात त्यांनी वापरलेल्या चपला पूजेसाठी ठेवल्या होत्या.