बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली. त्यानंतर चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक हटके फोटो शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एक हटके फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यांनी “८० व्या वर्षाकडे” असे कॅप्शन दिले आहे. तर ट्वीटरवर हा फोटो शेअर करतेवेळी “जेव्हा साठी (६०) तेव्हा पाठी आणि जेव्हा ऐंशी (८०) तेव्हा लस्सी!!! हे समजून घेणेही एक समज आहे,” असे अनोखे कॅप्शन दिले आहे. बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोत ते फार कूल दिसत आहे.
यावेळी बिग बींनी करड्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची पँट आणि त्यासोबत हिरव्या रंगाचे शूज परिधान केले आहेत. यासोबत त्यांच्या खांद्यावर एक बॅगही पाहायला मिळत आहे. बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत. यावर अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन- नंदा हिने कमेंट करत ते “७९ वर्षाचे झालेत”, असे सांगितले आहे. तर रणवीर सिंग अमिताभ यांच्या फोटोखाली “गँगस्टर” अशी कमेंट केली आहे. त्यासोबतच भूमी पेडणेकरने “स्वॅग, वाढदिवसाच्या शुभेच्छा सर” अशी कमेंट केली आहे.
दरम्यान अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे अमिताभ यांच्या कारकिर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. ‘चुपके-चुपके’, ‘नमक-हलाल’, ‘मिली’सारखे वेगळे चित्रपटही त्यांनी केले. तर ‘सिलसिला’, ‘कभी-कभी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा चित्रपटांमधून प्रेमाची नवी परिभाषा उलगडली.
हेही वाचा : ‘बच्चन’ नाही तर ‘हे’ आहे ‘बिग बीं’चं खरं आडनाव; जाणून घ्या आडनावामागची कथा
चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.त्यानंतर १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसंच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते.